नागपूर मनपा

मनपा विद्यार्थ्यांच्या रंगारंग सादरीकरणामुळे उपस्थित मंत्रमुग्ध

‘शिक्षणोत्सवा’त उमटली विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची मोहोर

कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘शिक्षणोत्सव 2025-26 चा दिमाखदार समारोप

नागपूर, ता.२० मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव’ चा शुक्रवारी (ता. २०) कविवर्य सुरेश भट सभागृहात दिमाखात समारोप झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी आणि हिंदी गीतांच्या तालावर रंगतदार नृत्य सादर केल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद मिळाल्याने विद्यार्थ्याचा उत्साह वाढला.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, मनपाचे विरोधी पक्ष नेते श्री. संजय महाकाळकर, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, श्रीमती सारिका नांदुरकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपशिक्षणाधिकारी श्री. संजय दिघोरे, श्रीमती सीमा खोब्रागडे, मुख्य समन्वयक श्रीमती अनिता भोतमांगे यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी महापौर निता ठाकरे म्हणाल्या की, नागपूर शहरातील सामान्य जनतेला उत्तम दर्जाचे मोफत शिक्षण देण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासोबतच, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर अधिक भर देण्यात येणार आहे. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना पूर्ण क्षमतेने अंमलात आणल्या जातील. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालक महानगरपालिकेच्या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून त्यांचे भविष्य आपल्या स्वाधीन करत असतात. त्यामुळे मनपा शाळांची प्रतिष्ठा अधिक वाढेल, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात सध्या विविध शाळांमधील स्पर्धा वाढली असून,इतर शाळांच्या तुलनेत आपण मागे पडणार नाही, यादृष्टीने ठोस योजना तयार करणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आव्हान समोर असल्याने आपण मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर यांनी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे व त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.

प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी केले. यावेळी त्यांनी मनपा शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी मिशन पटसंख्या हे मिशन सुरू केले असल्याचे सांगितले. त्यांनी मनपा शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवर अधिक भर दिले असल्याचे सांगितले. तसेच शिक्षणोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले. कार्यकार्माचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी पोहरे, श्रीमती मधु पराड, श्रीमती प्रतिभा लोखंडे, श्री. कृष्णा उजवणे यांनी केले, तर आभार शिक्षणोत्सवचे मुख्य समन्वयक श्रीमती अनिता भोतमांगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरवातील पीएम श्री लाल बहादूर शास्त्री शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शिक्षणोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची व स्पर्धांची चित्रफित आणि बालवाडी वर्गातील शिक्षकांची आणि शाळेच्या बळकटीकरणाची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धेतील उत्कृष्ट असे समुहगान व नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी समूहगीत लाल बहादुर शाळा यांनी सादर केले. नृत्याचे सादरीकरण नारी उच्च प्राथमिक शाळा, पारडी उच्च प्राथमिक शाळा आणि पीएम श्री संजयनगर शाळा तर्फे सादर करण्यात आले.

मनपातर्फे 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान झालेल्या शिक्षणोत्सवामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या शैक्षणिक वर्षात दुर्गानगर प्राथमिक शाळा प्रथम विजेता , तर विवेकानंद प्राथमिक शाळा उपविजेता ठरली. तसेच, पारडी उच्च प्राथमिक शाळा विजेती आणि दुर्गानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा उपविजेता ठरली. या शिक्षणोत्सवामध्ये या सर्व शाळांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यावेळी मार्च 2025 मध्ये इयत्ता १०वी व १२वी मध्ये शाखानिहाय तसेच माध्यमनिहाय सर्व प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे धनादेश आणि गोल्ड कॉईन देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच द्वितीय स्थानी आलेल्या विद्यार्थांना 15 हजार रुपयांचा धनादेश आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आला.

यावेळी 100 मीटर रेस, 200 मीटर रेस, मिक्स रिले, रिले, गोला फेक, लांब उडी, फुटबॉल, खो-खो, लंगडी, कबड्डी, कॅरम, चेस,रस्स खेच, क्रिकेट इत्यादी क्रीडा प्रकारा प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावलेले वयोगट 14 ते 18 असेल्याला वर्ग 6 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. शिवाय सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या कव्वाली, समूह गीत, लोकनृत्य, समूहनृत्य, आणि एकल नृत्य स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनीचा मोमेन्टो देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *