नागपूरच्या स्फोटक कारखान्यात रक्ताचा सडा; दीड वर्षात ४३ बळी देऊनही सरकार निद्रावस्थेत? वडेट्टीवारांचा ‘रुद्रावतार’!
विशेष प्रतिनिधी:नागपूरमधील स्फोटक कारखान्यांमध्ये होणारे मृत्यू हे अपघात नसून ‘सरकारी अनास्थेचे बळी’ असल्याचा घणाघाती आरोप आज विधानसभेत करण्यात आला. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या एसबीएल (SBL) कंपनीतील भीषण स्फोटाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. “दीड वर्षात ४३ कामगार मृत्युमुखी पडले, तरीही प्रशासन ढिम्म का?” असा सवाल करत वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाने सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली.
रविवारी झालेल्या भीषण स्फोटात २० कामगारांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात १९ महिलांचा समावेश होता. या वेदनादायी वास्तवावर बोट ठेवत वडेट्टीवार म्हणाले की, केवळ ३०० रुपयांच्या मजुरीसाठी हे लोक मृत्यूच्या दाढेत काम करत आहेत. नागपूर जिल्ह्यात असे ११ कारखाने असूनही त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ केवळ कागदोपत्रीच का केले जाते? अवघ्या १० किलोमीटरवर असणारे ‘पेसो’ कार्यालय आणि कामगार विभाग डोळे झाकून कोणाचे लाड पुरवत आहे? असे संतप्त प्रश्न त्यांनी विचारले. “मृतांच्या कुटुंबीयांना ५-१० लाख रुपये देऊन त्यांचे आयुष्य परत येणार नाही, त्यांना सुरक्षित कामाची हमी हवी आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
दुर्घटनेच्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नसणे, हे प्रशासनाचे सर्वात मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. या गंभीर विषयाची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी यावर येत्या शुक्रवारपर्यंत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या चर्चेतून दोषींवर कारवाईचे आदेश निघणार की पुन्हा केवळ आश्वासनांची खैरात होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




