खरी खरी

मराठी पाऊल पडते पुढे

आपले राज्य महाराष्ट्र आहे. आपल्या राज्याच्या नावामध्येच ‘महा’ ही आहे आणि ‘राष्ट्र’ ही आहे. असे आपले महाराष्ट्र राज्य अनेक विकसित राष्ट्रांपेक्षा प्रगतीच्या दिशेने उंच उंच झेप घेत आहे. सेनापती बापट म्हणतात त्याप्रमाणे ‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’ अशीच परिस्थिती आपल्या भारतामध्ये आहे. आपला महाराष्ट्र देशाच्या एकूण उत्पन्नात सिंहाचा वाटा उचलत असतो.

महाराष्ट्र केंद्राला जेवढे उत्पन्न देतो, त्या उत्पन्नाचा योग्य परतावा महाराष्ट्राला मिळत नाही, कारण आपले राज्य विकसित आहे. बिहारसारख्या राज्याला त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात महाराष्ट्रापेक्षा चौपट वाटा मिळतो. अशी परिस्थिती असली आणि केंद्राने महाराष्ट्राला राज्याची स्थापना झाल्यापासून सावत्रपणाची वागणूक दिली असली, तरी आपल्या राज्याने प्रगतीच्या बाबतीत अत्यंत उंच भरारी घेतलेली आहे.

महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचे वर्णन करताना आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि सुविद्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रगतीचा जो आलेख मांडला आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वोत्तम आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ ५० टक्के शहरात राहणारी आहे. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक यांपासून मिळणारे उत्पन्नही डोळ्यांत भरणारे आहे.

उदाहरणादाखल बोलायचे झाले तर, पहिल्या ३५ देशांचा विचार केला तर महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांच्यापेक्षा फार मोठी अर्थव्यवस्था निर्माण करून कायम ठेवलेली आहे. सध्या असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा हाच विकासदर कायम राहिला, तर येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये आपण संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू शकू, असे प्रतिपादन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नामध्ये कमालीची आणि दखल घेण्यायोग्य म्हणजे प्रशंसनीय प्रगती झालेली आहे. महाराष्ट्र हे जर वेगळे स्वतंत्र राष्ट्र असते, तर आपण जगातील सर्वात मोठ्या ५० अर्थव्यवस्थांपैकी ३० वी अर्थव्यवस्था ठरलो असतो. याचाच अर्थ जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे असा होतो.

अशा या महाराष्ट्रात आपण राहतो. आपण या महान मराठी महाराष्ट्राचे ‘मरहट्टे’ आहोत, हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे. कोणे एकेकाळी मराठी साम्राज्याने दिल्लीपर्यंत मजल मारली होती आणि अटकेपार आपले झेंडे रोवले होते. अनेक मराठी शिलेदारांनी मोठमोठी साम्राज्ये देशांतर्गत वसवली होती. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे ही त्यामधली काही महत्त्वाची नावे आहेत.

अशा या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे महत्कार्य आताच्या सरकारने सुयोग्य ठेवलेले आहे, ज्याचा फलादेश निश्चितच मनाला सुखावणारा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनानंतर आणि आकडेवारीनंतर खऱ्या अर्थाने ‘मराठी पाऊल पडते पुढे’, याचा प्रत्यय येतो आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *