टॉप स्टोरी महाराष्ट्र

एसटी महामंडळात १७,७४२ पदांची कंत्राटी मेगाभरती; अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई, दि. १७ : प्रतिनिधी:एसटी महामंडळात १७,७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी मेगाभरती करण्यात येणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या ८,३०० बससाठी ही भरती केली जाणार आहे. नियमित कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. तोपर्यंत बससेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सामान्य प्रवाशांना उत्तम सेवा देणे हेच एसटी तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी चालक-वाहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, आगार स्तरावरील निर्णयप्रक्रिया तसेच शिस्तभंग कारवाई या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देश त्यांनी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत दिले.

एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री सरनाईक यांची काल सकारात्मक चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी विधान भवनात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठकही घेतली. त्यानंतर विधानसभेत बोलताना त्यांनी कंत्राटी भरतीबाबत माहिती दिली.

लवकरच मुंबईसाठी ३० स्लीपिंग कोच बस आणि १७० आसनी ‘बोलो’ (इतर प्रकारच्या) बस उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही प्रकारच्या बसेस मुंबईसाठी मागवण्यात आल्या आहेत. तसेच महामंडळाच्या ताफ्यात एकूण ८,३०० नव्या बसचा समावेश लवकरच केला जाणार आहे. यासाठी १७,७४२ चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांत एसटी प्रवाशांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली होती. त्यानंतर महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आता एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *