काबुल, दि. १७ वृत्तसंस्था:अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. पाकिस्तानने काबूलमधील एका रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या हल्ल्यामुळे तालिबान सरकार प्रचंड नाराज असून, तणाव कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी मध्यरात्री पाकिस्तानने काबूलमधील ‘ओमिद’ रुग्णालयावर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे २५० जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळी या कक्षात सुमारे २००० लोक उपस्थित होते. अनेक जखमींची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या हल्ल्यांनंतर तालिबानने तीव्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तालिबानचे झबिहुल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता चर्चेची वेळ संपली, आम्ही आता पाकिस्तानकडून बदला घेऊ.” त्यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




