टॉप स्टोरी महाराष्ट्र

भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातला अटक; पाद्यपूजेमुळे रूपाली चाकणकर अडचणीत

मुंबई, दि. १८ प्रतिनिधी:नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रँच युनिट एकने अटक केली आहे. या भोंदू बाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. अशोक खरातने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत, ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने ‘श्री शिवनिका संस्थान’ या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. आता अशोक खरातचे पाद्यपूजन करतानाचे रूपाली चाकणकरांचे फोटोही समोर आले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता रूपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, ज्यामुळे सामाजिक कामाच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो. त्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *