टॉप स्टोरी देश

पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

नवी दिल्ली, दि. १५ वृत्तसंस्था:देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली. देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. विशेष म्हणजे या पाच राज्यांच्या निवडणुकीसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका होत असून २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, आसाममध्ये सर्व १२५ मतदारसंघांमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच केरळमध्येही १४० विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. या दोन्ही राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी केली जाईल. तामिळनाडू मधील २३४ विधानसभा मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार असून १५२ आणि १४२ मतदारसंघांमध्ये अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल. या सर्व विधानसभा निवडणुकीचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत.

“गेल्या काही दिवसांत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा दौरा करून तयारीचा आढावा घेतला. आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची भेट घेऊन त्यांच्या सूचनांचा स्वीकार केला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. प्रशासनाने मतदार यादी पुनरावलोकनासाठी केलेल्या कामगिरीबद्दल बूथस्तरीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे,” असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. निवडणुका होत असलेली पाचही राज्ये भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करतात, असे सांगत त्यांनी मतदारसंख्या, मतदान कर्मचारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती दिली.

पाच राज्यांतील एकूण मतदारांची संख्या १७.४ कोटी इतकी आहे, तर एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण २.१९ लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५ लाख कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कार्यरत राहणार असल्याची माहितीही आयोगाने दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *