बोलावं तर लागेलच

‘भाववाढ की आयुष्यभराची दरवाढ?’ : ‘दैनिक महासागर’च्या चर्चासत्रात घमासान

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी):आखाती देशांमध्ये बॉम्ब पडत असले, तरी त्याचे भीषण हादरे आता थेट तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरात बसू लागले आहेत. युद्धाच्या आगीच्या झळांनी आता महाराष्ट्रालाही कवेत घेतले असून, सर्वसामान्यांचा खिसा अक्षरशः होरपळून निघत आहे. घरगुती गॅस सिलेंडर थेट ६० रुपयांनी भडकला आहे, खाद्यतेलाने १० ते १५ रुपयांची उसळी घेतली आहे, तर कोळसाही किलोमागे ५ ते ६ रुपयांनी पेटला आहे. आर्थिक राजधानी मुंबईची अवस्था तर याहून विदारक आहे; तब्बल ५० टक्क्यांहून अधिक हॉटेल्सना टाळे लागले असून, जे सुरू आहेत तिथे गरिबांचा आधार असलेला ‘वडापाव’ सुद्धा आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
​परंतु, आज खरा सवाल या तात्कालिक महागाईवर नाही, तर व्यवस्थेच्या नियतीवर आणि हेतूवर आहे. युद्ध आज ना उद्या संपेलच, पण हे आकाशाला भिडलेले भाव कधी खाली येतील का? की युद्धाच्या नावाखाली लादलेली ही दरवाढ कायमची आपल्या बोकांडी बसवली जाईल? सरकार या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना आयुष्यभरासाठी लुटणार का? याच खळबळजनक प्रश्नांचा आणि वास्तवाचा पर्दाफाश करण्यासाठी *’महासागर डिजिटल चॅनेल’*च्या ‘बोलावं तर लागेलच..’ या विशेष कार्यक्रमात “भाववाढ की आयुष्यभराची दरवाढ?” या ज्वलंत विषयावर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ​दिग्गजांची उपस्थिती होती आणि सडेतोड सवाल- जबाब विचारण्यात आले.
या लक्षवेधी चर्चासत्रात भाजप नेते प्रशांत कोटकर, प्रसिद्ध समाजसेविका जयश्री झा आणि ज्येष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक जयंत महाजन यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व रोखठोक सूत्रसंचालन ‘दैनिक महासागर डिजिटल’चे संपादक स्वप्निल दुधारे यांनी केले.
​’लाडकी बहीण नको, रोजगार द्या’ असा जयश्री झा यांनी प्रहार करत चर्चा गाजवली.
चर्चेदरम्यान समाजसेविका जयश्री झा यांनी व्यवस्थेवर थेट आणि सडेतोड प्रहार केले. त्या म्हणाल्या, “इतिहासात आजवर कुठल्या ना कुठल्या कारणाने झालेली दरवाढ ही कायमस्वरूपीच राहिली आहे. याचा फटका नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीवर बसतो आणि सरकार मात्र याचा केवळ राजकीय व आर्थिक फायदा लाटते.” यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावताना, “आम्हाला सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना नको, तर बेरोजगार महिलांच्या हाताला शाश्वत रोजगार द्या,” अशी रोकठोक मागणी करत महिलांच्या खऱ्या प्रश्नांना वाचा फोडली.
विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देताना भाजप नेते प्रशांत कोटकर यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. “आमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे अत्यंत सक्षम आणि संवेदनशील नेतृत्व आहेत. आखातातील युद्ध संपल्यानंतर गॅसच्या दरात झालेली ही वाढ नक्कीच कमी केली जाईल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला जाईल,” असा ठाम शब्द त्यांनी या व्यासपीठावरून दिला.
मात्र, कोटकर यांच्या या आश्वासनावर ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन यांनी जोरदार आक्षेप घेतला. ऐतिहासिक दाखले देत त्यांनी हे दावे खोडून काढले. ते म्हणाले, “यापूर्वी जेव्हा-जेव्हा युद्ध झाले किंवा अलीकडच्या कोरोना काळात जी दरवाढ झाली, ती कधीही मागे घेण्यात आलेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, सरकारच्या तिजोरीत सध्या खणखणाट आहे. त्यामुळे सरकार अशा आपत्कालीन संधीचा फायदा उचलून आपली रिकामी झालेली तिजोरी भरण्याचाच प्रयत्न करत असते.” जर हे युद्ध असेच लांबले, तर घरगुती गॅस सिलेंडरवरील सध्याची ६० रुपयांची दरवाढ भविष्यात आणखी भडकेल, अशी रास्त व गंभीर भीतीही त्यांनी व्यक्त केली.
​एकंदरीत, ‘महासागर डिजिटल’वरील या घमासान चर्चेने सर्वसामान्यांच्या मनातील खदखद आणि भविष्यातील आर्थिक चिंतेला एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले. युद्धाच्या धुराळ्यात लपलेली ही महागाईची ठिणगी आता कोणता वणवा पेटवणार आणि सरकार यावर काय तोडगा काढणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *