अंकशास्त्राचा ‘खेळ’ की २०० कोटींचा महाघोटाळा? भोंदूबाबा खरातची नाशिक ते शिर्डीपर्यंत पसरलेली माया पाहून पोलीसही अवाक!
विशेष प्रतिनिधी:नाशिक: ‘भविष्य’ सांगण्याच्या बहाण्याने सर्वसामान्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत सर्वांना भुरळ घालणाऱ्या अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. महिला अत्याचार प्रकरणी कोठडीत असलेल्या या भोंदूबाबाने केवळ अंकशास्त्राच्या जोरावर तब्बल २०० कोटींची अफाट मालमत्ता जमवल्याचा खळबळजनक अंदाज पोलीस यंत्रणेने वर्तवला आहे. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी (SIT) पथकाने जेव्हा खरातच्या मालमत्तेची कुंडली मांडली, तेव्हा समोर आलेली आकडेवारी पाहून तपास यंत्रणांचेही डोळे विस्फारले आहेत.
तपासादरम्यान सिन्नरच्या मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊसवर पडलेल्या छाप्यात केवळ १ पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळली नाहीत, तर जमिनीच्या खरेदीखतांचा डोंगरच पोलिसांच्या हाती लागला आहे. खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील बड्या धेंडांना ‘शुभ दिवसांचे’ स्वप्न दाखवून खरातने नाशिकच्या पाथर्डी शिवारात १५० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ३० एकर जमीन लाटली आहे. याव्यतिरिक्त पत्नी आणि दोन मुलींच्या नावे पाथर्डी आणि गौळाणे परिसरात कोट्यवधींच्या जमिनींचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
खरातच्या विलासी जीवनाचा पुरावा देणारी काही प्रमुख मालमत्ता खालीलप्रमाणे आहे:
राजेशाही थाट: सिन्नरमध्ये १० कोटींचे भव्य फार्महाऊस, कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा आलिशान बंगला आणि कॅनडा कॉर्नरला १ कोटींचे कॉर्पोरेट ऑफिस.
जमिनीचे जाळे: सिन्नरच्या कहांडळवाडीत २ कोटींची ४५ एकर जमीन, तर ओझर विमानतळ आणि जानोरी भागात ५ कोटींच्या जमिनी.
धार्मिक उलाढाल: त्याच्या इशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वर्षाकाठी २ कोटींची उलाढाल होत असल्याचे समोर आले असून, शिर्डीसारख्या मोक्याच्या ठिकाणीही त्याने करोडोंची शेतजमीन खरेदी केली आहे.
अत्यंत हुशारीने आणि राजकीय वरदहस्ताने उभारलेले हे २०० कोटींचे साम्राज्य आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. खरातने या मालमत्तेसाठी कोणाकोणाचे खिसे रिकामे केले आणि त्याला कोणाचे अभय होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या ‘कॅप्टन’ने रचलेली ही आर्थिक मायाजालाची फाईल जसजशी उघडत आहे, तसतसे नाशिकच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात धाबे दणाणले आहेत.




