नाशिक

नाशिक–कर्नाटक संयुक्त तपासात मोठे विरोधाभास; ७ अटकेत तरीही गूढ कायम

कथित ४०० कोटींची कंटेनर लूट

नाशिक | तब्बल चारशे कोटी रुपयांच्या कथित रोख रकमेच्या कंटेनर लुटीप्रकरणी तपास जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसं या प्रकरणातील गूढ अधिकच गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील पोलिस यंत्रणा सध्या एकाच प्रकरणावरून वेगवेगळे दावे करत असल्याने संपूर्ण तपास प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत सात संशयितांना अटक करण्यात आली असून, नाशिकमध्ये दाखल झालेले कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक सध्या ताब्यात असलेल्या संशयितांची कसून चौकशी करत आहे. लूट नेमकी कशी झाली, कंटेनरमध्ये खरंच ४०० कोटींची रोकड होती का, आणि या कथित लुटीमागे नेमकी कोणती आंतरराज्यीय टोळी कार्यरत आहे, याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबईहून नाशिकमार्गे कर्नाटककडे जाणाऱ्या एका कंटेनरची चोर्ला घाट परिसरात लूट झाल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित घटनेनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. नाशिक ग्रामीण पोलिसांत संदीप पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला चौघांना अटक केली. त्यानंतर तपासाची दिशा बदलत गेली आणि जयपूर येथून विराट सतीश गांधी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपासात आणखी संशयित निष्पन्न होत गेल्याने अटकांची संख्या सातवर पोहोचली आहे.

मात्र, किशोर सावळा हा संशयित अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाला नाट्यमय वळण देणारा मुद्दा म्हणजे कर्नाटक पोलिसांचा थेट नकार. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी चोर्ला घाट परिसरात ४०० कोटींच्या कंटेनर लुटीची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्टपणे सांगत, हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

या परस्परविरोधी दाव्यांमुळे प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. एकीकडे नाशिक ग्रामीण पोलिस व कर्नाटक पोलिस संयुक्त तपास करत असताना, दुसरीकडे लूट घडलीच नसल्याचा कर्नाटक पोलिसांचा दावा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे अधिकारी पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले असून, ताब्यात असलेल्या संशयितांकडून कसून चौकशी सुरू आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून, ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, कथित ४०० कोटींची यादवी, राज्यांतील विरोधाभासी दावे आणि फरार संशयितांमुळे हा तपास नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *