भंडारा शहराजवळ शहापूर येथील ग्रामपंचायत सदस्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन गाडेकर यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल बॉम्ब टाकून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास अचानक पणे गाडेकर यांच्या घराच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फेकून कुटुंबीयांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही किंवा दुखापत झाली नाही. मात्र घराच्या आवारात उभ्या असलेल्या चार दुचाकी व एक कार जळून खाक झाल्या आहेत. आग लागली याची कल्पना होताच गाडेकर कुटुंबीयांनी आरडाओरड केली. या आवाजाने शेजारी धावून आले. लोक जमा होताना बघताच हल्लेखोर पळून गेले. पण या हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे याचा शोध लागू शकला नाही.




