अपघातानंतर चालक वाहनासह पसार; मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मलकापूर (कैलास काळे) –मलकापूर शहरातील नांदुरा रोडवरील मातोश्री जिनींग समोर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या आयशर मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत प्रविण संतोष कवळे (वय ३०, रा. देवधाबा, ता. मलकापूर) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृतकाचा भाऊ गणेश संतोष कवळे (वय ३५, व्यवसाय – शेती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर कंपनीच्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण कवळे हे त्यांच्या हिरो एच.एफ. डिलक्स दुचाकी (क्र. MH-28 AV/3045) ने हायवेवरील सर्विस रोडने येत असताना मातोश्री जिनींग समोर रॉंग साइडने येणाऱ्या आयशर मालवाहू वाहन (क्र. MH-28 BH-4243) ने समोरासमोर जोरदार धडक दिली. सदर आयशर वाहन कापसाने भरलेले असून चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात प्रविण कवळे गंभीर जखमी झाले असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघात घडवून आणल्यानंतर आयशर वाहन चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी अपघात गुन्हा क्रमांक 04/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106, 125 (a) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोहेका सचिन पाटील (ब.नं. 1957) यांनी दाखल केला असून प्राथमिक तपास मपोहेका सविता मोरे (ब.नं. 1870) या करीत आहेत.
घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पसार झालेल्या वाहन चालकास तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




