नार्वेकरांनी स्वत:ला ‘नायक’ समजू नये – उद्धव ठाकरे
ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहार बनवत आहेत – राजठाकरे
मुंबई, दि. ४ प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा युतीचा जाहीरनामा जाहीर केला. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली.
देशातील वातावरण असे आहे की, जणू लोकशाही जमावाने ताब्यात घेतली आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मतांची चोरी केल्यानंतर, ते आता उमेदवारांची चोरी करतात, असा आरोप उद्धव यांनी महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांच्या बिनविरोध विजयावर केला.
उमेदवारांना बिनविरोध निवडून देऊन तुम्ही मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या पाहिजेत…” ज्या वॉर्डांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत त्या निवडणुका रद्द करा, त्या वॉर्डांमध्ये पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करा:, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.
“… ही आता लोकशाही नाही तर झुंडशाही आहे, जरी आपण त्यांना मतदान चोरी करताना रंगेहाथ पकडले तरी आता त्यांनी उमेदवारांची चोरी करायला सुरुवात केली आहे…” आम्ही निवडणूक आयोगाला आव्हान देतो की, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे सर्व कॉल रेकॉर्ड दाखवावेत, आम्हाला ते पहायचे आहे…” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे उमेदवार आणि मतदारांना उघडपणे धमकावत आहेत, हे खूपच धक्कादायक आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; त्याला तात्काळ निलंबित केले पाहिजे, ते अधिकाऱ्यांना नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यास सांगतात; त्यांना हा अधिकार विधानसभेच्या आत आहे, बाहेर नाही. राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे’ असे ठाकरे म्हणाले.
“भाजपने पश्चिम बंगालमधील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, आता महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल त्याच पक्षाचे काय मत आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. कोणाकडेही कायमस्वरूपी सत्ता नसते, जर त्यांना वाटत असेल की त्यांना कधीही सत्तेवरून हटवले जाणार नाही, तर त्यांनी याचा पुनर्विचार करावा. मी हे अनेक वर्षांपासून सांगत आहे की, ते महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि बिहार बनवत आहेत. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. ज्यांना राजकारणात यायचे आहे, ते आपल्या विचारधारा बदलत आहेत…” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
या पत्रकार परिषदेची सुरुवात करत राज ठाकरेंनी सांगितले की, मी नव्या शिवसेना भवनामध्ये पहिल्यांदाच आलोय. माझ्या जुन्या शिवसेना भवनासोबत बऱ्याच आठवणी आहेत. नवीन शिवसेना भवनात कुठे काय आहे?, हे मला माहिती नाही. पण संजय राऊत यांनी वारंवार २० वर्षांनंतर आलेत असा उल्लेख केलाय, तेव्हा मला आता कुठून तरी सुटून आल्यासारखे वाटतेय. जुन्या सेनाभवनातील बऱ्याच आठवणी या रोमांचकारी आहेत.
आनंददायी आणि अशा त्या आठवणी सांगत बसलो तर इतक्या गोष्टी सांगता येतील, अगदी ७७ साली शिवसेना भवन जेव्हा झाले तेव्हा जनता पक्षाचे सरकार होते. बाळासाहेबांची ती सभा झाल्यावर सेना भवनावर दगडफेक झाली होती, असेही राज ठाकरे म्हणालेत. तसेच शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा एक संयुक्त जाहीरनामा आम्ही प्रकाशित करतोय. परवा आदित्य आणि अमित ठाकरे यांनी या वचननाम्यातील सर्व गोष्टी सांगितल्याच आहेत. त्यावर परत किती चर्चा करायची? असे यावेळी राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी जो प्रचार सध्या चालवा आहे त्याचा लवकरच सुरू होणाऱ्या सभांमध्ये चांगलाच समाचार घेईन, असे स्पष्ट करत राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे देणे टाळले.




