माणूसपणाची पाऊलवाट

स्त्री पुरुष समानता काळाची गरज

आजची स्त्री ही सक्षम आहे असे म्हणताना हे सक्षमीकरण कितपत गुणात्मक आणि कितपत संख्यात्मक आहे, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर तिला कितपत आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक स्वातंत्र्य मिळते, यात दडले आहे. स्त्री ही मुळातच सक्षम आहे, ती दुर्बल बनली आहे तर आजतागायत असलेल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे. स्त्री-पुरुष समानता आणायची असेल तर पुरुषांमध्ये स्त्रीविषयी सकारात्मकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज आहे. असे परखड मत महिला सक्षमीकरण, लिंगभेद या विषयांवर चर्चासत्रे, कार्यशाळा घेऊन वैचारिक प्रबोधन करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांच्या अभ्यासक अश्विनी मोरे परखडपणे मांडतात.

मराठवाड्यातील हिंगोलीत शिक्षक असलेले वडील हिंम्मतराव मोरे आणि गृहिणी असलेली आई सुमन मोरे अशा सर्वसाधारण घरात अश्विनी मोरे यांचा जन्म झाला. घरात सदस्यसंख्या अधिक असल्याने आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यांच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध, तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न झाले. हुंड्यासाठी तिचा अतोनात झालेला शारीरिक आणि मानसिक छळ, यामुळे तिचे घरी परतणे, समाजाचा विधवा, परित्यक्ता आणि मुलींकडे बघण्याचा अमानवीय दृष्टिकोन—याचे गंभीर पडसाद त्यांच्या मनःपटलावर उमटले.

मुळातच बंडखोर असलेल्या आणि ‘का?’ असे प्रश्न विचारणाऱ्या अश्विनी मोरे पेटून उठल्या. त्यांनी त्याच क्षणी ठरविले की स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय आणि मनाजोगा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करायचे नाही. यासाठी त्यांनी प्रथम आपले शिक्षण पूर्ण केले.
जिल्हा परिषद शाळांपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास राज्यशास्त्रात एमए, पत्रकारिता, महाराष्ट्रातील महिला पत्रकारितेचा इतिहास या विषयावर प्रबंध, वुमेन्स स्टडीमध्ये नेट असा अखंडपणे सुरू आहे. आणि आता त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रामध्ये प्राध्यापिका आहेत. त्या स्त्रीवादी वक्त्या म्हणून राज्यभर ओळखीच्या आहेत.

पुरुषांच्या चौकटीत स्त्रियांचे बंदिस्त झालेले आयुष्य पाहताना त्यांनी समाजामध्ये स्त्री_ पुरुष समानता निर्माण करण्यासाठी स्त्री प्रश्नांवर काम करण्याचे ठरविले. यातूनच महाविद्यालयात असताना मुलींचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्त्री शिक्षण यासाठी त्या सक्रियपणे कार्य करू लागल्या. त्या सांगतात की परभणी येथे आदिवासी मुलीवर झालेल्या बलात्काराच्या विरोधात जे आंदोलन उभे राहिले त्यात त्यांनी सहभाग घेतला आणि अमरावतीला अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले. यामुळे त्यांना व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना दोन दिवस जेलमध्ये राहण्याची शिक्षा झाली होती. त्यात पाच मुली व 20 मुले होती. या पाच मुलींमध्ये अश्विनी मोरे या एक होत्या. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, महाविद्यालयीन शुल्क अशा जनहितार्थ कार्यातून त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाले.

यानंतर वुमेन्स स्टडीमध्ये नेट केल्यानंतर त्यांना स्त्री आणि तिचे प्रश्न अधिक व्यापक स्तरावर उमगले. यातून त्यांना जाणवले की स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकुचित झालेला परिघ हा क्षितिजापलीकडे न्यायचा असेल, स्त्री-पुरुष समानता आणायची असेल, तर पुरुषांमध्ये स्त्रियांप्रतीची जाणीव आणि संवेदनशीलता रुजविण्याची नितांत गरज आहे.

ह्या उद्दिष्टपूर्तीसाठी त्या स्त्री सक्षमीकरण आणि लिंगभेद यावर कार्यशाळा, चर्चासत्रे घेऊ लागल्या. सुरुवातीला महाविद्यालयात जाऊन विविध ऑडिओ-व्हिज्युअल क्लिप्स, उदाहरणे देऊन आणि शेवटी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या वैचारिक प्रबोधनातून त्यांनी त्यांच्यामधील स्त्री-संवेदनशीलतेचा भाव जागृत केला. यातूनच त्यांनी ‘लिंगभेद : चर्चा विश्व’ आणि ‘स्त्री अभ्यास : चर्चा आकलनाच्या दिशेने’ या दोन पुस्तकांचे संपादन केले. आता त्या विविध महिला मेळाव्यांतून आणि बोलावेल तेथे जाऊन महिलांमध्ये वैचारिक प्रबोधन करण्याचे मोठे कार्य करीत आहेत. तसेच अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाच्या त्या अधिक्षिका असून ‘आस्था डे केअर सेंटर’च्या समन्वयक म्हणूनही उत्तम कार्य करीत आहेत.

त्या म्हणतात की शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे माध्यम असून, माझ्या वैचारिक प्रबोधनातून स्त्रियांमध्ये वैचारिक क्षमता दृढ करून त्यांच्यात निर्णयशक्ती निर्माण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

पत्रकारिता करीत असताना त्यांना जाणवले की इतिहासाच्या पटलावर स्त्री ही अदृश्य आहे. पत्रकारितेच्या अभ्यासामध्ये महिला पत्रकारांचा समावेश नाही. यातूनच त्यांनी महाराष्ट्रातील महिला पत्रकारितेचा इतिहास या विषयावर प्रबंध लिहिला. यावर काम करीत असताना अनेक महिला पत्रकारांचे कार्य त्यांना जाणून घेता आले. या महिला पत्रकारांमध्ये दिनबंधूच्या पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांचे नाव त्या आवर्जून घेतात. यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे, मुक्ता साळवे, राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडला.

पत्रकारितेचा अभ्यास करताना त्यांना जाणवले की पुरुषांचे क्षेत्र असणाऱ्या या क्षेत्रात महिला फक्त मेट्रोपॉलिटन सिटीतच दिसतात. गावपातळीवर महिला पत्रकारांची संख्या शून्य आहे. आजही महिला पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधी, संपादक या पदांसाठी संघर्ष करावा लागत आहे. माध्यमांबाबत त्या म्हणतात की, माध्यमांतूनही स्त्रियांची प्रतिमा ही पारंपारिक साचेबद्ध अशा पद्धतीनेच प्रदर्शित केली जाते.जाहिरात क्षेत्रामध्ये महिलांना उपभोगाची वस्तू आणि घर व कुटुंब हेच तिचे पहिले विश्व आहे, या स्वरूपात दाखविले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव अधिक असल्याने तीच भावना नव्या पिढीमध्ये रुजते.

या लेखातून त्या प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छितात की आपल्या इच्छांना मजबूत विचारांचे आणि शिक्षणाचे बळ द्या. फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालत त्यांनी आपल्या पायावर उभे राहून आपल्या न्याय हक्क अधिकारांविषयी लढणे गरजेचे आहे त्यांनी स्वतःला एक व्यक्ती म्हणून बघणं आवश्यक आहे. आपल्या वैचारिक प्रबोधनातून स्त्रियांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणाऱ्या प्रा. डॉ. अश्विनी मोरे यांच्या वैचारिक प्रबोधनाचे कार्य असेच अखंड सुरू राहो यासाठी आमच्या शुभेच्छा.

प्रा. डॉ.अश्विनी मोरे
संपर्क क्रमांक : ९४०५३४२१८५

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *