माणूसपणाची पाऊलवाट

वास्तवाच्या आंतरिक सत्याचा अविष्कार : धीरज पावडे

आरशातील प्रतिबिंब ही प्रतिमा आणि एखाद्या घटनेचे वास्तववादी चित्रण हे एक ऐतिहासिक समीकरण आहे. एखाद्या घटनेमध्ये वास्तववादी लेखक त्याला काय हवे आहे हे न बघता वास्तवाच्या आंतरिक सत्याचा अविष्कार करीत असतो. या आंतरिक सत्याच्या शोधात नित्याच्या नातेसंबंधातील जिव्हाळा आणि प्रेम यापासून तर जगण्यातील सामाजिक व आर्थिक व्यवस्थेला बळी पडलेल्या पिडीतांचे, शोषितांचे, दुर्बलांचे जीवन संघर्ष हे ज्यांच्या साहित्यकृतीचे विषयच होत नाहीत तर विश्वचैतन्य निर्माण करणारै वास्तववादी लेखक म्हणून ज्यांनी आपले वेगळे स्थान साहित्य विश्वात निर्माण केले आहे असे ज्येष्ठ कवी, लेखक धीरज पावडे हे थेट सामान्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात.
भावनांची अभिव्यक्ती आणि आशय घनता हा धीरज पावडे यांच्या लिखाणातील स्थायी भाव आहे. या माध्यमातून शब्दसौंदर्याची निर्मिती आणि मांडणी करत तेवढ्याच सरल, तरल, व सृजनात्मक पद्धतीने परिस्थितीतील सत्यता जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची ताकद, कला आणि कल्पकता लाभलेले धीरज पावडे हे प्रत्येक साहित्यकृतीची निर्मिती करताना सूक्ष्म निरीक्षण, अभ्यास आणि संशोधनाची जोड देतात. म्हणूनच त्यांच्या लिहिलेल्या कविता, कथा जेवढ्या असामान्य आहेत तेवढ्यात सामान्यांच्या भावनांना हात घालणाऱ्या आहेत.
वडील बालासाहेब देशमुख पावडे आणि आई शालिनी पावडे यांच्या संस्कारांच्या छत्रछायेत धीरज पावडे लहानाचे मोठे झाले. वडील शुगर फॅक्टरीत असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत असत. यामुळे विविध भागातील पंधरा शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेले धीरज पावडे यांनी विविध स्तरातील सामाजिक परिस्थिती आणि त्यातील जगण्यातील संवेदना जवळून अनुभवल्या. पुढे त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि इतिहासात एम.ए., एम.एस. डब्ल्यू.आणि बीएड केले. आता ते वाशिम जिल्ह्यातील शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भर जहागीर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून विद्यादानाचे कार्य करीत आहेत.
विद्यार्थीदशेतच धीरज पावडे यांना वाचन व लेखनाची सवय जडली. मराठीच्या व हिंदीच्या कविता त्यांना आवडू लागल्या आणि प्रभावित करू लागल्या. घटनेतील वास्तविक मर्म शब्दात उतरविण्याची कला त्यांच्या रक्तातच असल्याने त्यांनी आठवीत असतानाच सायकल वरची पहिली हिंदी कविता लिहिली. हा प्रसंग सांगताना कवी म्हणतात की एकदा चुलत काकांची सायकल ते वापरण्यासाठी घेऊन गेले आणि त्यांच्या हाताने सायकलचा एक्सेल तुटला. त्यांनी काकांना न कळवता परस्पर सायकलचा हा भाग बदलविला. पण काकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर राग धरला आणि म्हणाले की अशा वागणुकीतून गुन्हा लपणार आहे का. ही घटना त्यांच्या मनावर परिणाम करून गेली आणि त्यांच्या लेखणीतून कवितेचा जन्म झाला. आणि येथून वास्तववादी कवितांचा सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरू असून आतापर्यंत त्यांनी 300 च्यावर कविता लिहिलेल्या आहेत आणि चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
सोच इन्सान की राख हो गई
युही नहीं बस्तीया खाक हो गयी
वो यादे जिंदगी जहा हसीन थी
वो दुनिया आज क्या से क्या हो गई
या त्यांच्या कवितेमध्ये लेखकाने गावांमधील बदललेले चित्र आणि मावळत चाललेले छोट्या छोट्या प्रसंगातील आनंद याचे भावस्पर्शी चित्रण केले आहे.
अशाच प्रकारे त्यांनी आपल्या कवितांमधून शैक्षणिक विषय, आजचे विद्यार्थी जीवन, अंधश्रद्धा आणि त्यातून येणाऱ्या यातना, स्त्रियांचे भावविश्व, कामगार, शेतकरी, मजूर अशा शोषितांच्या जगण्यातील आपरिहार्यता‌ या विषयांना स्पर्श केला नाही तर प्रत्येक विषयाच्या खोल खोल गर्ततेत जात वाचकाला भीषण वास्तव्याशी जोडले आहे. माॅ संपादकोंका मातृस्मरण, संपूर्ण हिंदी व्याकरण एवं उपयोजित लेखन, तसेच हिंदी व मराठी भाषेतील संदल ही चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.‌
संतोष मिजगर यांच्या माध्यमातून आकारास आलेले संदल हे पुस्तक प्रेमकहाणी भोवती गुंफून मानवतेचा आणि सर्वधर्मसमानतेचा संदेश देणारे आहे. या पुस्तकावर चित्रपट निर्मिती होणार असून अजय देवगन या अभिनेत्याची यात मुख्य भूमिका असणार आहे. असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
याशिवाय महिलांचे भावविश्व हा त्यांच्या जवळचा विषय असून महिलांच्या जीवन संघर्षावर आधारित चारचौघी, गुलाब, संघर्षपथ आणि इश्कपथ ही त्यांची आगामी पुस्तके आहेत.
इश्कपथ या पुस्तकामध्ये विद्यार्थी दशेत पलायन करणार्‍या मुलामुलींचे अपरिपक्व प्रेम आणि दिशाहीन जीवन यावर वास्तववादी प्रस्तुती केली आहे. ते म्हणतात की हे पुस्तक इतके सुंदर झाले आहेत की यावर चित्रपट बनू शकेल. आणि जर कोणी चित्रपट बनविला नाही तर मी स्वतः बनविल असे ते मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. हा चित्रपट म्हणजे तरुणांना आत्मभान निर्माण करायला लावणारा आणि सैराट या चित्रपटाला उत्तर असलेला चित्रपट राहील याची ते ग्वाही देतात.

संत कबीर , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, हिटलर यांचा विशेष प्रभाव असलेले धीरज पावडे या थोर पुरुषांच्या विचारधारेतून चालतात. आणि हाच आदर्श शिक्षक असलेले पावडे आपल्या विद्यार्थ्यांमध्येसुद्धा निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कारावा म्हणून वाशिम जिल्ह्यात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पहिले कवी संमेलन घेतले आणि विद्यार्थ्यांना कविता लिहिण्यासाठी प्रवृत्तच केले नाही तर पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहितसुद्धा केले. त्यांच्याच मार्गदर्शनातून एका आठवीतील विद्यार्थ्याने कादंबरी लिहिली. वाशिम जिल्ह्यामध्ये वनिता फिल्मस् ने जय गजानन श्री गजानन हा व्हिडिओ अल्बम काढला होता त्यामध्ये पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विद्यार्थ्यांनी अभिनय आणि नृत्य सादरीकरण केले होते. असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. याशिवाय पाठ्यक्रमातील अभ्यासक्रम रंजनात्मक करण्यासाठी ते अभ्यासातील घटक विषय नाट्यरूपांतरित करून विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन शिकवितात. विद्यार्थ्यांसाठी नाटके लिहिणे, त्यांच्याकडून अभिनय करून घेणे, पथनाट्य, गीत सादरीकरण या सर्व उपक्रमांमधून धीरज पावडे विद्यार्थ्यांचे आवडते लेखक आणि शिक्षक झाले आहेत.

संगणक शिष्यवृत्ती मध्ये त्यांचे 150 विद्यार्थी पात्र झाले आहेत आणि यासाठी धीरज पावडे यांना औरंगाबाद येथे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. एन.एम.एम.एस या परीक्षेमध्ये त्यांचे 52 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे
शिक्षक आणि लेखक म्हणून जगत असताना या दोन बिंदूंना त्यांनी सामाजिक उपक्रमातून एकत्र बांधले आहे. विविध संस्थांशी ते जुळले असून या माध्यमातून बचत गटांच्या मार्फत महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे काम ते राज्यभर करतात. संसार उध्वस्त करणारे दारूचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. यातून समाजाला परावृत्त करण्यासाठी ते नशाबंदीचे उपक्रम राबवितात.‌ राज्यभर व्यक्तिमत्व विकास शिबिरांमध्ये मास्टर ट्रेनर म्हणून त्यांना निमंत्रण दिल्या जाते.
सिद्धार्थ से पुरुषोत्तम तक आणि मराठ्यांचे पानिपत ही त्यांची दोन आगामी येणारी पुस्तके आहेत तर परभणीचे खासदार राहून चुकलेले त्यांचे चुलत आजोबा शिवाजीराव देशमुख यांच्यावरील पुस्तक हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे.
साहित्य, विद्यादान, नाटक, अभिनय आणि सामाजिक कार्य अशा सर्व अंगांना स्पर्श करणारे धीरज पावडे जीवनातील प्रत्येक घटीतामागील वस्तुनिष्ठतेचा पाठपुरावा करीत

आपल्या कल्पनेतून आणि आशय गर्भित शब्दांच्या यथोचित मांडणीत सामान्यांपर्यंत जाऊन पोहोचणारे धीरज पावडे यांना त्यांच्या प्रत्येक कृतीतून आत्मानंदाची प्राप्ती होवो आणि त्यांचा हा प्रवास अखंड यशाच्या पथावर चालत राहो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *