महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. ११ :महापालिका निवडणुकीसाठी नुकताच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून ३० हजार लिटर मोफत पाणी, मोफत बस सेवेचे आश्वासन दिले. आज भाजपने महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मनपा बसमधून मोफत बसप्रवासाचा अपवाद वगळला तर मोफत योजनांना बगल दिली आहे. भाजपने जाहीरनाम्यातून जुन्याच योजनांना पुढे घेऊन जाण्यासोबत नागपुरात विदेशी दूतावास, मेट्रो टप्पा तीनचा संकल्प केला असून यातून नागपूरकरांसाठी सर्वोत्तम क्रमांक एकच्या शहराची उभारणी करण्याची ग्वाही दिली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ५०० वर्गफूट घरांना मालमत्ता करापासून मुक्त करण्याची घोषणा भाजपनेही त्यांच्या जाहीरनाम्यातून केली आहे.




