मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या सूचना
नागपूर, ता. १३ : नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणा-या माजी महापौर, माजी उपमहापौर आणि पदाधिकारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनपाच्या स्थापना दिनी येत्या २ मार्च २०२६ रोजी त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी सूचना मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिवसाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.१३) महापौर कक्षात बैठक पार पडली. बैठकीत मनपाचे उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त तथा निगम सचिव डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे, क्रीडा निरीक्षक श्रीमती उज्वला चरडे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
भारताचे झिरो माईल अशी ओळख असलेले व भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला २ मार्च २०२६ रोजी ७५ पूर्ण वर्षे होत आहेत. “पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. गत ७५ वर्षात शहराच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात यावा, हयातीत नसलेल्या पदाधिकारी यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात यावा, याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिल्या.




