नागपूर

गोरगरिबांच्या तोंडचा घास कुणी हिरावला? नागपुरात मंत्र्यांना घेराव, पोलिसांशी राडा; ‘शिवभोजन’ योजनेचा श्वास कोंडणार?

विशेष प्रतिनिधी:उद्धव ठाकरे सरकारने सुरू केलेली आणि कोरोना काळात सर्वसामान्यांची भूक भागवणारी १० रुपयांची ‘शिवभोजन थाळी’ योजना आता भ्रष्टाचाराच्या की निधीच्या कचाट्यात सापडली आहे, असा प्रश्न पडू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनेचे अनुदान थकल्याने संतप्त झालेल्या केंद्र संचालकांनी आज नागपुरात थेट सरकारविरुद्ध शड्डू ठोकला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालून घोषणाबाजी करण्यात आली, तर एका आंदोलकाने थेट पोलिसांशीच दोन हात केल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मोठा थरार पाहायला मिळाला.
वर्षभरापासून छदामही हाती न पडल्याने कर्जबाजारी झालेल्या केंद्र संचालकांचा बांध आज फुटला.

विभागीय आयुक्त कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या बावनकुळे यांच्या ताफ्यासमोर आंदोलकांनी “सरकार मुर्दाबाद”च्या घोषणा दिल्या. विशेषतः महिला संचालकांनी मंत्र्यांचा रस्ता रोखून धरला. याच गोंधळात एका संतप्त संचालकाची पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की झाली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. उद्धव ठाकरेंच्या काळातील योजना म्हणून फडणवीस सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत आहे का? असा रोखठोक सवाल आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला.
आंदोलकांचा हा रुद्र अवतार पाहून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ मध्यस्थी केली. “अनेकांनी बँकांचे कर्ज काढून ही योजना चालवली आहे, त्यांचे १० महिन्यांचे पैसे प्रलंबित आहेत ही वस्तुस्थिती आहे. मी मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी या विषयावर तातडीने चर्चा करणार आहे,” असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. तसेच आक्रमक झालेल्या संचालकांवर कोणतीही पोलीस कारवाई करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मात्र, केवळ आश्वासनांनी आमची चूल पेटणार नाही, अशा पवित्र्यात आंदोलक अडून बसले होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *