चिचोलीच्या रस्त्यावर हात पाय मोडल्यावर, पडल्यावर, मृत्यूचे खापर कुणावर फोडायचे
मौदा प्रतिनिधी: स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा चिंचोली ( धानला) हा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे हा रस्ता अक्षरशः चाळणीसारखा दिसत असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाला. अपघातग्रस्तांचे हात पाय तुटले तर या अपघाताचे खापर कुणावर फोडायचे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे,
या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्यांमुळे. व धुळीमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. खड्डे चुकवताना अनेक वेळा किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार विनंती करून रस्ता दुरुस्त करा म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी मागणी रेटून धरली होती, अनेकदा या रस्त्यासंदर्भात बातम्या प्रकाशित झाल्या त्याचा काहीच फायदा झाला नाही, उलट स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळेत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत,
प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
तालुक्यातील चिंचोली ( धानला) परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील ग्रामस्थांसाठी नागपूर . भंडारा आणि मुख्य तालुका आदी शहरांकडे जाण्यासाठी चिंचोली ( धानला) हाच अर्धा किलोमीटरचा जीवघेणा मुख्य रस्ता आहे. मात्र या रस्त्याची चाळणी झाल्याने दररोज अपघातांची शक्यता बळावली आहे,
रस्त्यावरून येणारे जाणारे आमोरासमोर वाहन आले की एक वाहन खाली उतरविण्यासाठी मोठी करत करावी लागते. आणि उतरली तर वर चढविण्यासाठी जीव मुठीत घेऊन वर चढवावी लागते, तर अनेकदा रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी किरकोळ अपघात सुद्धा झाले आहेत, या मुख्य रस्त्यावरून शाळकरी मुलांसह सर्वसामान्य प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे. याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही दिसून येत आहे,
( तालुक्यातील अर्धा किलोमीटरचा चिंचोली ( धानला) या रस्त्याची अशी दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत, )




