नागपूर मौदा

चिकना गावात वाघाची दहशत – वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन जगतोय!

मौदा:- चिकना गावात दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 ते 5 वाजताच्या सुमारास पांडुरंगजी गावंडे यांच्या गाय व बछड्यावर वाघाने हल्ला केला. या भयानक हल्ल्यात गायीचा बछडा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना म्हणजे वन विभागाच्या निष्क्रियतेचा थेट परिणाम आहे.
महत्वाचे म्हणजे यापूर्वीही नदीकाठच्या परिसरात वाघाचा मुक्त वावर अनेक वेळा निदर्शनास आणून दिला होता, तरीही वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आज त्याची किंमत शेतकरी व गोपालक आपल्या जनावरांच्या आणि स्वतःच्या जीवावर बेतणाऱ्या परिस्थितीत मोजत आहेत.
सध्या गावात कापूस, तूर, गहू व चण्याच्या मशागतीचा हंगाम जोरात सुरू आहे, मात्र वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत, शेतमजूर काम सोडून पळ काढत आहेत.
जर उद्या एखादा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण?
वन विभाग की निष्काळजी प्रशासन?
आज जनावरांवर हल्ले होत आहेत, उद्या माणसांवर झाले तर प्रशासन जागे होणार का?
तरी आम्ही चिकना गावातील शेतकरी व ग्रामस्थ ठामपणे मागणी करतो की –
या परिसरात तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा,
वन विभागाची सतत गस्त, ड्रोन, कॅमेरे व पिंजऱ्यांची त्वरित उभारणी करावी,
हल्ल्यात जखमी झालेल्या जनावराची तात्काळ व संपूर्ण नुकसानभरपाई अदा करावी,
गावकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत लेखी हमी द्यावी.
आता केवळ पाहणी नको – कृती हवी!
अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, याची सर्वस्वी जबाबदारी वन विभाग व शासनाची असेल.
चिकना गावातील संतप्त शेतकरी व ग्रामस्थ

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *