गेल्या दोन – तीन दिवसांत अक्कलहीन भिड्याने यवतमाळ आणि अमरावती येथे जी विधाने केली आहेत, ती त्या माणसाच्या वैचारिक दारिर्द्याची व द्वेषाची उदाहरणे आहेत. आपण काय बोलतो, त्याचा देशातील जनमानसावर काय परिणाम होईल, याचा जराही विचार न करता बरळणाऱ्या संभा भिड्याला अनेक लोकांनी जोड्याने मारून जोड्याचाच अपमान केला आहे. या भिड्याच्या तोंडात इतकी पराकोटीची विष्ठा भरली आहे की, तो वेळोवेळी ती विष्ठा ओकत असतो. महात्मा गांधी यांच्याबद्दल त्याने जे विधान केले आहे, ते असे की, एका मुस्लिम जमीनदाराचा मोहनदास गांधी हा मुलगा आहे. हा भिड्या त्या मुस्लिम जमीनदाराच्या या काळातला पुनर्जन्म घेतलेला अवतार आहे काय? नसेल तर त्याच्या अपरिपक्व डोक्यातून जे भंपक विधान बाहेर पडले आहे, त्यासाठी त्या माणसाला कोणती शिक्षा करावी हे आता सरकारने ठरविले पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा महात्मा गांधींबद्दल उच्चारलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
खासकरून हेही सांगितले आहे की, या भिड्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. अशी वक्तव्ये उच्चारण्यापूर्वी या भिड्याची जीभ आपोआप का गळून पडली नाही हेही आमच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गौरव करताना असे म्हटले होते की, ते गेल्या दशकातील एकमेव असे नेतृत्व होते की जे देशाच्या सीमा सोडून जगभर पसरले गेले. त्यांचे तत्त्वज्ञान व्यापक होते. त्यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही.
राज ठाकरे यांनी मागील वर्षी गांधी जयंतीच्या दिवशी ट्विटरवरून ही पोस्ट केली होती. ज्या काळात साधा टेलिफोनही नव्हता किंवा होता तरी तो फक्त अतिश्रीमंतांच्या घरात होता त्या काळात गांधीजींचा प्रभाव सर्व जगावर सूर्यप्रकाशासारखा पडला. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया वगैरे तर आजची आयुधे आहेत. त्या काळात वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या बातम्या हाच काय तो माहिती देण्याचा एकमात्र आधार होता. महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे ज्या ब्रिटिशांचे राज्य जगातील कित्येक देशांवर पसरले होते त्या सर्वांना स्वातंत्र्याचा उदय पाहता आला. महात्मा गांधी सर्व माणसांना समान मनात असत. यामुळेच महात्मा गांधी यांनी भारतातील कित्येक अज्ञानाच्या शृंखला तोडण्याचा प्रयत्न केला होता.
अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी जीवाचे रान केले होते. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आपला ठसा उमटवला. आज जगात महात्मा गांधी यांच्यावर सर्वाधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग किंवा दक्षिण आफ्रिकेचे महान नेते नेल्सन मंडेला यांनी प्रेरणा घेतली होती. अशा या महात्म्याबद्दल अत्यंत नीचपणाचे हलकट विधान करून हा भिड्या थांबला नाही तर त्याने कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. इतरही सुधारणावादी पुढाऱ्यांची नावे त्याने घेतली आहेत. आम्ही मुद्दाम सर्वांचा उल्लेख करत नाही. पण या भोंदू भिड्याच्या डोक्यात आदर्श मानले जातात अशांबद्दल किती घाण भरलेली आहे याचे दर्शन झालेले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले किंवा राजा राममोहन राय वगैरेंनी या देशाच्या समाजातील वातावरण समतेच्या दिशेने नेण्यासाठी जे काही केले त्यामुळे त्यांना तेव्हाच्या परकीय सरकारने गौरविले म्हणजे ते देशभक्त नाहीत, असा करंटा आरोप करणाऱ्या आणि नको त्या ठिकाणी त्या विषयांवर विकृत बुद्धीने भिडणाऱ्या भिड्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. त्याच्यावर केवळ गुन्हा दाखल करून त्याला मोकाट सोडणे म्हणजे आपल्या देशाचे वातावरण जहरी करण्यासाठी मुभा देण्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे – ‘ ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी ‘ या नाठाळ भिड्याचे काय करावे हे आपण सर्वांनी ठरविले पाहिजे.