कुळगांव बदलापूर नगरपरिषदेसाठी अभिमानाचा क्षण! अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना ‘राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक’
बदलापूर,दि.२७,प्रतिनिधी,कुळगांव बदलापूर नगरपरिषद अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी मा. श्री. दामोदर वांगड यांना देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक’ पुरस्कार देण्यात आले आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांना त्यांच्या उत्कृष्ट, धाडसी व समाजोपयोगी सेवेसाठी दि. २६ जाने. २०२६ रोजी ‘राष्ट्रपती गुणवंत सेवा पदक’ पुरस्कार गौरविण्यात आले आहे. या गौरवामुळे कुळगांव बदलापूर नगरपरिषद व अग्निशमन विभागाचा नावलौकिक वाढला सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांनी आपल्या सेवाकाळात अनेक भीषण आगीच्या घटना, आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा व कार्यक्षमतेची दखल घेत भारत सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या सन्मानाबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बदलापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्याकडून दामोदर वांगड यांचा गौरव करण्यात आला. व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कुळगांव बदलापूर नगरपरिषद नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले व मुख्याधिकारी मारुती गायकवाड, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान,दामोदर वांगड यांच्या या यशामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे गौरव उद्गार व्यक्त केले आहेत.



