अडीच-अडीच वर्ष महापौरपदासाठी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) मध्ये सकारात्मक चर्चा – आ.विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : चंद्रपूर मनपा सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये आता काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात महत्त्वाची सहमती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महापौरपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली असून या विधानामुळे सत्तास्थापनेच्या समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
चंद्रपूर मनपा सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील गटबाजीचा फायदा घेत भाजपाचा महापौर होवून सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला.कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा शिवाय कोणलाही सत्ता स्थापन करता येणार नसल्याने शिवसेना (उबाठा) किंगमेकरच्या भूमिकेत आली.मनपा निवडणुकीत काँग्रेस २७, भाजप २३, शिवसेना (उबाठा) ६, वंचित २, अपक्ष २, शिवसेना (शिंदे) १, बसपा १, एमआयएम १ असा कौल जनतेनी दिला.
मनपात ६६ नगरसेवक असून बहुमतासाठी ३४ चे संख्याबळ आवश्यक आहे.शिवसेना (उबाठा) ने वंचितला सोबत घेवून ८ नगरसेवकांची गट नोंदणी केली.तसेच या गटाला २ अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा आहे.यामूळे या १० नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व भाजपाने हालचाली सुरु केल्या.महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) ने महापौर पद व स्थायी समिती सभापती पदाची अट घातल्याने काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला.या १० नगरसेवकांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती.ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा अशी सूचना केली.
यामूळे शिवसेना (उबाठा) ला पर्याय उपलब्ध झाला.यानंतर भाजपाच्या हालचाली वाढल्याने काँग्रेस विधीमंडळ नेते आ.विजय वडेट्टीवार यांनी थेट मातोश्री गाठत उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने सत्तास्थापनेबात चर्चा झाली. महापौरपद व स्थायी समिती सभापती पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा पर्यायही चर्चेत झाला असून या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.मात्र पहिले अडीच वर्ष कोणाचा महापौर होईल याबाबत विनायक राऊत व अनिल देसाई यांचेकडे चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे.पहिले महापौरासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उध्दव ठाकरे यांचेशी चर्चा करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी बोलतांना सांगितले.




