संदीप काळे:अनेकांना अजितदादा यांच्यासाठी वापरलेला ‘मुख्यमंत्री’ हा शब्द कदाचित तांत्रिकदृष्ट्या नक्कीच खटकेल, पण हा वास्तवाचा आरसा काही वेगळाच होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या त्या भीषण काळात प्रशासनाची सर्व सूत्रे अजितदादांच्या हातात होती. मंत्रालयातील अनेक बैठकांना पत्रकार म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला, तेव्हा जाणवायचे की, अजितदादाच मुख्यमंत्री म्हणून सर्व जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला हा माणूस या राज्याचा ‘लोकनियुक्त मुख्यमंत्री’ व्हावा, अशी इच्छा महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ते, समाजाच्या मनात होती. पण सत्तेच्या पदापलीकडे जाऊन गेल्या तीन टर्ममध्ये दादांची कार्यपद्धती एखाद्या मुख्यमंत्र्याला साजेशीच होती. त्यांना केवळ ‘मुख्यमंत्री’ असे पद मिळाले नाही काय ते एवढेच.
दादा नाही,आज हे सर्व लिहिताना लेखणी जणू थबकते आहे. केवळ मुख्यमंत्री पद नव्हे, तर देशाच्या राजकारणात सक्षम नेतृत्व करण्याची धमक असणारा हा ‘दादा माणूस’ आज महाराष्ट्राला पोरका करून गेला. त्यांच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक स्मृती आणि आठवणींचा ‘महासागर’ समोर उभा आहे. तो थट्टा-मस्करी करणारा, स्पष्ट बोलणारा आणि प्रत्येकाचे प्रश्न तडीला नेणारा ‘अजितदादा’ नावाचा माणूस आता पुन्हा होणे नाही, हेच दाहक सत्य आहे.
मला आजही आठवते, मी आणि पत्रकार चेतन बंडेवार बारामतीला होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पत्रकार अधिवेशनासंदर्भात दादांना भेटायला गेलो होतो. पहिल्याच भेटीत दादांनी स्पष्ट सांगितले, “नियोजन समोर ठेवा आणि मगच चर्चेला बसा.” दुसऱ्या भेटीत आम्ही बारामतीला गेलो. नियोजनाचा आराखडा मांडला. बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी त्यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटलांना विचारले, “मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या जेवणाचं काय?” त्यांच्या आदरातिथ्याचा तो ओलावा आजही आठवतो. जेवण झाल्यावर पुन्हा बैठक सुरू झाली. प्रत्येक विषयातील त्यांचा बारकावा, हवा असलेला संदर्भ आणि “बारामतीला येणारी पत्रकार मंडळी इथलं वैभव पाहून गेली पाहिजेत,” हा त्यांचा आग्रहीपणा थक्क करणारा होता.
कार्यक्रमाच्या अगोदर आम्ही जेव्हा त्यांना मलबार हिलच्या बंगल्यावर भेटायला गेलो, तेव्हा माझ्या आणि चेतन यांच्या हातातील पुष्पगुच्छ पाहून दादा आपल्या खास शैलीत म्हणाले होते, “हा पुष्पगुच्छ लाखांमध्ये राहू द्या, कोटींमध्ये जाऊ देऊ नका!” त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने वातावरणात एकच हशा पिकला. छोट्या गोष्टीला विनोदाची झालर लावत प्रत्येकाला न्याय मिळेल याची खबरदारी घेणे आणि जे शक्य नाही त्याला ‘नाही’ म्हणण्याचे नैतिक धाडस दाखवणे, ही ‘दादा स्टाईल’ फक्त त्यांच्याकडेच होती.
बारामतीच्या अधिवेशनानंतर चार दिवसांनी दादा आणि सुनेत्रा पवार यांनी आम्हाला मलबार हिलच्या बंगल्यावर घरी जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर दादांनी एक कागद माझ्या हातात देत ते म्हणाले, हे पाहा “बारामतीच्या अधिवेशनावर झालेला खर्च मी माझ्या वैयक्तिक खिशातून केला आहे, हे तुम्हाला सांगायचे होते, आणि तुम्ही काम चांगले केले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन करायचे होते, म्हणून तुम्हाला जेवायला बोलावले. दादाचे ते बोलणे ऐकून आम्ही एकदम शांत झालो. नाहीतर नेहमी राजकीय मंडळी त्यांच्यावर आलेले आर्थिक ओझे दुसऱ्यावर टाकतात, हे नवे नाही.
दादांच्या पुढाकारातून पुण्यात ‘सारथी’ हा उपक्रम सुरु झाला आणि अशोक काकडे नावाच्या अधिकाऱ्याने दादांचे स्वप्न साकार केले. ‘सारथी’ने बहुजनांच्या शेकडो मुलांना लाल दिव्याची गाडी दिली. असे अनेक उपक्रम दादांच्या नावे आहेत ज्यांचा इतिहास झाला आहे.
“दादांच्या पारदर्शकतेला आणि प्रामाणिकपणाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. राजकारणात ते जितके कणखर होते, तितकेच आपल्या माणसांच्या बाबतीत हळवे आणि निष्ठावंत होते. ज्यांना दादा कळाले, ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले आणि ज्यांना त्यांचा फटकळपणा किंवा कामाचा ‘फॉलोअप’ झेपला नाही, ते दूर गेले. जे दूर गेले तेही आज दादांच्या जाण्याच्या वार्तेने ढसाढसा रडताना आपण पाहिले.
दुसरा एक किस्सा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाची साक्ष देतो. माझ्या पुण्यातील ‘सारथी’वरील विजयी भव पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील सारथीच्या सभागृहात दादांच्या हस्ते झाले. सकाळी आठची वेळ असूनही सभागृह खचाखच भरले होते. दादांनी भाषणात पुस्तकाचे खूप कौतुक केले. दादा कार्यक्रमातून बारामतीला गेले. कार्यक्रमानंतर दीड तासांनी मला दादांचा फोन आला. ते म्हणाले, संदीप पुस्तक फार छान झाले,”जसे सारथीवर हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तक केले, तसेच पुस्तक बारामतीमधील कलाशिल्पांवर आणि नवनवीन वास्तूंवर लिहून द्याल का?” मी आनंदाने होकार दिला. प्रत्येक गोष्टीला हेरायचे, त्यात बारकावे शोधायचे आणि ते समाजोपयोगी कसे ठरतील यासाठी पुढाकार घ्यायचा, हा दादांचा हातखंडा होता.
प्रशासनात आणि पक्षात त्यांचा असलेला दरारा कमालीचा होता. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष समर्थपणे चालवून महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती असाव्यात, ही त्यांची इच्छा अखेरपर्यंत ‘अधुरीच’ राहिली. त्यांनी दुसरा राष्ट्रवादी पक्ष उभा केला, पण मनातील दुफळीची सल त्यांना कायम टोचत राहिली. ज्या कार्यकर्त्यांनी आपली हयात एकाच विचारात घालवली आणि केवळ दादांच्या शब्दाखातर ते त्यांच्यासोबत आले, त्यांच्या आयुष्यात दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या निमित्ताने संजय मिस्कीन सारख्या अनेक निष्ठावान ज्येष्ठ पत्रकारांचे,मोठे पदाधिकारी यांचे चेहरे माझ्या समोर येत आहेत. यांचे आता पुढे काय होणार? जे समाजासाठी, पक्षासाठी ‘दादामय’ होते, असा प्रश्न पडतोय. अख्खा राष्ट्रवादी पक्ष आपल्या खांद्यावर असावा आणि त्याच पक्षाच्या माध्यमातून काळानुरूप त्यांनी स्वाभिमानी विचारांचा दुसरा राष्ट्रवादी पक्ष उभा केला खरा, पण घरातील आणि पक्षातील, युतीमधील दुफळीचे शल्यत्यांच्या मनाला कायम बोचत राहिली.
दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ‘मुख्यमंत्रीपद’! सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेला हा माणूस आज ना उद्या राज्याचा मुख्यमंत्री होईल, हे स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या त्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना आज शब्दांत मांडता येणार नाहीत. ज्यांनी आपली उभ्या आयुष्याची कमाई एका पक्षासाठी खर्च केली आणि केवळ दादांच्या एका शब्दाखातर नव्या वाटेवर चालले, त्यांच्या राजकीय प्रवासाचा या घटनेने जणू ‘अश्वत्थामा’ झाला आहे.
उद्या काय होईल? पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची धुरा येईल ? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा सुतळीसारख्या एकत्र विणल्या जातील? शरद पवार निवृत्ती जाहीर करून ‘आता भांडू नका, हे सूत्र तुम्ही सांभाळा’ असे म्हणतील? सुप्रियाताई कडे केंद्राची पूर्ण जबाबदारी येईल? हे सगळे ‘जर-तर’चे खेळ आज गौण वाटतात. सत्य हेच आहे की, आज महाराष्ट्र एका अशा नेतृत्वाला मुकला आहे, ज्याची जरब आणि प्रशासकीय पकड प्रत्येकाला हवीहवीशी वाटत होती. आज केवळ बारामती पोरकी झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्याही दोन पावले पुढे जाऊन अहोरात्र काम करणारा एक ‘शिस्तबद्ध कर्मयोगी’ गेल्यामुळे देशाच्या राजकारणातही एक रितेपण आणि नैराश्य दाटून आले आहे.
विखुरलेली राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होऊन त्याच जोमाने कार्य करेल, हीच आता अपेक्षा आहे. ज्या उदात्त भावनेने आणि ध्येयाने अजितदादांनी महाराष्ट्रासाठी स्वतःला झिजवले, तेच कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ज्या ज्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना दादांनी राजकारणात शब्द दिला होता, त्या प्रत्येक शब्दाचा सन्मान राखला जाणे आणि त्यांच्या वारशाचा योग्य गौरव होणे, यातच त्यांच्या आत्म्याचे समाधान असेल. माणूस किती काळ जगला यापेक्षा, तो आपल्या स्वाभिमानासाठी आणि माणसांसाठी कसा जगला, यालाच इतिहास साक्ष देतो. अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने तो इतिहास सुवर्ण अक्षरात कोरला आहे.
आता ‘जर-तर’च्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. भविष्यात काय होईल, कोण पक्षाची कमान सांभाळेल, हे काळच ठरवेल. पण आज हा महाराष्ट्र अशा एका माणसाला मुकला आहे, ज्याचे कणखर नेतृत्व प्रत्येकाला हवेहवेसे वाटत होते. आज केवळ बारामती किंवा महाराष्ट्रच पोरका झाला नाही, तर देशाच्या राजकारणात एक शिस्तबद्ध आणि कर्तृत्ववान अध्याय संपल्याने कमालीची उदासीनता दाटून आली आहे.
माणूस किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला आणि माणसांसाठी किती जगला, यालाच खरे महत्त्व आहे. अजितदादा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या वाघासारखे जगले. राजकारणातील हा ‘मोठा दादा’ आज गेला असला, तरी समाजकारणावर असलेला त्यांचा धबधबा सदैव कायम राहील.
अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली…!
(लेखक महासागर मीडिया ग्रुपचे मुख्य समूह संपादक, आहेत.)




