नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेत स्विकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेत चुरस!

नवी मुंबई :महापालिकेच्या निवडणूका झाल्या, भाजप बहूमतात आले, महायुतीमधील शिवसेना पक्षाला ४२ जागांवर मजल मारुन विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. महापालिका स्थापनेनंतर प्रथमच स्विकृत नगरसेवकांची संख्या दहावर गेल्याने इच्छूकांच्या पालिका सभागृहात जाण्याच्या महत्वाकाक्षांना नव्याने उभारी मिळाली आहे. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपला सहा तर शिवसेनेला चार स्विकृत नगरसेवक सभागृहात पाठविण्याची संधी मिळणार आहे. शिवसेना पक्षामध्ये स्विकृत नगरसेवकांसाठी चार जागांसाठी असंख्य इच्छूक निर्माण झाल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता प्रत्येक मतदारसंघातून दोन स्विकृत नगरसेवक देणार असल्याची शिवसेनेत चर्चा आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये द्वारकानाथ भोईर, एम के. मढवी यांच्या नावाची शिवसेनेत जोरदार चर्चा असून द्वारकानाथ भोईर यांच्या घरातील सदस्याला पालिका निवडणुकीत तिकीट मिळाले होते, परंतु ते पराभूत झाले.

बेलापुर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवकांच्या नावाचीच स्विकृत नगरसेवकांसाठी चर्चा जोरदार असून अनेकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काहींना पक्षातून स्पष्ट नकार देण्यात आला असल्याची शिवसेनेत चर्चा सुरु आहे. सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे मातब्बर प्रस्थ असलेले नामदेव भगत, दिलीप घोडेकर, सोमनाथ वासकर, रंगनाथ औटी, यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *