अजितदादांच्या विरहानंतर राष्ट्रवादीची विजयाकडे वाटचाल; जनतेने मतांमधून वाहिली आपल्या नेत्याला श्रद्धांजली?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:”जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश, हे केवळ राजकीय यश नसून ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसेवेला आणि विकासात्मक दृष्टीला जनतेने दिलेली एक मोठी आदरांजली आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना या निकालांनी चोख उत्तर दिले असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, अजितदादांनी आपल्या राजकीय आयुष्यात नेहमीच तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. विकासाचा वेग कसा वाढवता येईल, यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. आजचा हा निकाल म्हणजे त्यांच्या कामावर जनतेने ठेवलेल्या अढळ विश्वासाची साक्ष आहे. मतदारांनी केवळ मतदान केले नसून, दादांच्या कार्याचा गौरव केला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजितदादांच्या पश्चात ही पहिलीच मोठी परीक्षा पक्षासमोर होती. या यशाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, विस्कळीत होऊ पाहणाऱ्या फळीला पुन्हा एकदा संजिवनी मिळाली आहे. तटकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, दादांचा विकासाचा वारसा पुढे नेणे आणि जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणे हीच आता आमची मुख्य जबाबदारी आहे. या निकालांमुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून, भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दादांच्या विचारांवर अधिक ताकदीने काम करत राहील, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
—
Deepak Kaitke




