जुईनगरमध्ये रस्ते कामातील बेफिकिरीचा कळस; झाडांवर खिळे ठोकून ‘वर्क इन प्रोग्रेस’ फलक: ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर नागरिक संतप्त.
नवी मुंबई :शहर सुशोभीकरण आणि दर्जेदार नागरी सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या महानगरपालिकेच्या कामांमध्ये प्रत्यक्षात किती हलगर्जीपणा चालतो, याचे धक्कादायक उदाहरण जुईनगर सेक्टर २५ परिसरात समोर आले आहे. जुईनगर रेल्वे फाटक ते राजीव गांधी ब्रिज दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात संबंधित ठेकेदाराने अक्षरशः पर्यावरण आणि नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे.
या कामाचा ठेका ‘ए आय सी मुंबई’ या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र कामाच्या ठिकाणी सुरक्षेची आणि शिस्तीची कोणतीही काळजी न घेता ‘Work in Progress’ (वर्क इन प्रोग्रेस) चे फलक थेट रस्त्यालगतच्या झाडांवर खिळे ठोकून लावण्यात आले आहेत. नागरी कामांसाठी वापरले जाणारे तात्पुरते स्टँड किंवा बॅरिकेड्स वापरण्याऐवजी झाडांना खिळे ठोकणे हे केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर पर्यावरणाविरोधातील उघड बेदरकार वृत्ती असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, झाडांमध्ये खिळे ठोकल्याने त्यांच्या खोडांना जखमा होतात, बुरशी व किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि झाडे हळूहळू सुकण्याचा धोका निर्माण होतो. शहरात आधीच हरित पट्टा कमी होत असताना महानगरपालिकेच्या देखरेखीखालीच अशा प्रकारे झाडांची हानी होणे अत्यंत चिंताजनक आहे.
स्थानिक नागरिक अजय मोरे यांनी या प्रकाराबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “नागरिकांच्या कराच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये अशी बेफिकिरी अजिबात सहन केली जाणार नाही. ठेकेदाराला दंड ठोठावून त्याची माहिती जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत जसे की,नागरी कामांची गुणवत्ता तपासणारे अभियंते आणि अधिकाऱ्यांची देखरेख कुठे आहे?
पर्यावरण नियमांचे पालन होत आहे का?
ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी काय करते?
महानगरपालिकेने तात्काळ या प्रकाराची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर आणि कामांवर देखरेख करणाऱ्या अभियंत्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच पुढील कामांमध्ये अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.
नागरी विकासाच्या नावाखाली झाडांची हानी आणि निष्काळजीपणे कामे सुरू राहिली, तर ‘स्मार्ट सिटी’चा दावा केवळ कागदावरच राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया असणाऱ्या आशयाचे पत्र मनसेचे जुई नगर येथील आरोग्य सेवक अजय मोरे यांनी मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना तक्रार स्वरूपात दिले आहे.




