‘सस्पेन्स’ संपला? विलीनीकरणाच्या चर्चेला शशिकांत शिंदेंची पूर्णविराम; दादांच्या ‘त्या’ शेवटच्या इच्छेबाबत केला खळबळजनक खुलासा!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची. मात्र, या चर्चेला आता अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे. “ज्यांच्याशी वाटाघाटी करायच्या होत्या, तो चर्चेतील मुख्य दुवाच आता हरपला आहे. त्यामुळे आता जर-तरच्या गप्पा मारण्यात काहीच अर्थ नाही,” अशा मोजक्या पण जळजळीत शब्दांत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या प्रकरणावर पडदा टाकला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
विलीनीकरणावरून अजितदादा गटाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, विलीनीकरणाची चर्चा ही केवळ हवेतली नव्हती. दादा हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत हालचाली सुरू होत्या आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित होता. “आम्ही फक्त सत्य बोललो आणि तेही शपथपूर्वक! दादांची ही इच्छा होती, म्हणूनच आम्ही ती मांडली. पण आता चर्चा करणारा नेताच राहिला नसल्याने आम्ही हा विषय आता कायमचा बंद केला आहे,” असे शिंदेंनी जाहीर केले. विलीनीकरणासाठी आम्ही कोणतीही घाई केली नसल्याचे सांगत त्यांनी चेंडू दुसऱ्या गटाच्या कोर्टात ढकलला आहे.
या वादात ‘अजितदादांची चूक’ या विधानावरून निर्माण झालेल्या वादावरही शिंदेंनी मवाळ भूमिका घेतली. “दादा अत्यंत भावनिक होते. साहेबांसमोर आल्यावर त्यांनी कधी नजरानजर केली नाही. त्यांना पक्षातील फाटाफूट दुरुस्त करायची होती, हे वास्तव आहे. तरीही माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो,” असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधाबाबत विचारले असता, शिंदे यांनी सावधगिरी बाळगत त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.
आता विलीनीकरणाचा विषय बासनात गुंडाळून शरद पवार गट पुन्हा एकदा स्वबळावर पक्ष उभा करण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. “आम्ही आता जोमाने कामाला लागणार आहोत, विलीनीकरणावर आता पुन्हा कधीच भाष्य करणार नाही,” असा पवित्रा शिंदेंनी घेतला आहे. दादांच्या निधनानंतर राजकारणात जे वादळ उठले होते, ते विलीनीकरणाची शक्यता मावळल्याने आता शांत होते की आणखी वेगळे वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.




