नागपूर : शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला. यानंतर एका वाघाच्या आत्महत्येचे एक इंग्रजीतील पत्र समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाले आहे. हे पत्र लिहिणा?्याने नावाचे गुपित ठेवले असेल तरीही त्यातला मजकूर प्रत्येक वन्यजीवप्रेमीच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.
माझी ओळख करून देतो. माझं नाव छोटा मटका नाही, जय नाही. माझ्यामागे टेलिफोटो लेन्स घेऊन फिरणारा ताफा नव्हता. मी फक्त दीड वर्षांचा, उपप्रौढ नर वाघ होतो. सरकारी कागदोपत्री पत्ता सांगायचा तर बुटीबोरी रेंज, सुकळी बीट. माझं खरं घर? बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड-पवनी-क?्हांडला अभयारण्याला जोडणारा वन्यजीव मार्ग.
माज्या आई-वडिलांनी जपलेली भूमी. काल रात्री माझा मृतदेह रेल्वे खांब क्रमांक ८१९/२२ जवळ सापडला. ठिकाण रमणीयच म्हणायचं. एका बाजूला विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, दुसरीकडे ब्रम्हाकुमारीजचा आश्रम. शांत, प्रसन्न परिसर. कधीकाळी होता. अधिकृत अहवालात शब्द असतील, अपघाती मृत्यू, धावत्या रेल्वेची धडक, उपप्रौढ नर. चौकशी होईल. खुणा तपासल्या जातील आणि फाईल बंद. पण ही माझी नोंद आहे.
विकासाची चिरफाड सुरुवात झाली हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामागार्पासून. आठ पदरी रस्ता, १२० मीटर रुंदीचा हक्काचा पट्टा. माज्या आजोबांच्या अधिवासातून गेलेली काँक्रीटची कायमची जखम. मग रेल्वेचा विस्तार. दोन नव्हे, चार मार्गिका. वेगवान गाड्या. भिंती उंच, अभेद्य. तुमच्या काचेतून १३० किलोमीटर प्रतितास वेगाने निसर्ग झरझर मागे सरकतो; पण आम्हाला तो तुटून पडलेला दिसतो. जुना नागपूरझ्रवर्धा महामार्गही रुंदावतोय. आठ पदरी. जणू एक महामार्ग अपुरा पडला. खाजगी बांधकामदारांचे फलक सर्वत्र लक्झरी व्हिला विथ व्ह्यू. दृश्य कशाचं? संपलेल्या वन्यजीव मार्गाचं?
एपीएल आणि बीपीएल वाघ
माझी भावंडं शहाणी. संरक्षित क्षेत्रातच थांबली. ती एपीएल वाघ. अन्न, राखणदार, निधी, अधूनमधून मान्यवरांची भेट. मी मात्र भटकलो. स्वभावधर्माने. वाइल्डलाईफ इन्स्टिट्युट आॅफ इंडियाने नकाशावर दाखवलेला मार्ग खरा असेल, असं वाटलं. वाकेश्वर तलाव परिसर, शहराच्या कडेकडेची जंगले ही माझी पिढीजात भूमी. आता? मी बीपीएल वाघ. माझ्यासाठी कोणती योजना? कोणतं शिधापत्र? कोणतं मताधिकार? माझ्याकडे उरलं ते फक्त आकसत जाणारं जंगल.
पर्याय आणि निर्णय
एका बाजूला समृद्धीचा गडगडाट. दुसरीकडे रेल्वेची भिंत. मागे रुंदावणारा महामार्ग. मध्ये उगवणारे प्लॉट. पर्याय दोनच. एक म्हणजे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न. धडक बसण्याची शक्यता. दोन म्हणजे शहरात शिरणं. मानवांसाठी धोका ही आरोळी. मग भूल देऊन पकडणं. आयुष्यभर बंदिस्त प्रदर्शन गोरेवाडा झू किंवा वनतारा येथे. पहिला पर्याय अधिक सन्मानजनक वाटला. किमान झटपट. भारताच्या प्रगतीचं प्रतीक आणि विस्मृतीत गेलेल्या अरण्याचं प्रतीक अशी टक्कर.
ही आत्महत्या आहे
माझा मृत्यू अपघात नाही. तो आत्महत्या आहे. योजनाबद्ध, कोट्यवधींच्या विकासाने घडवलेली. माझ्यासाठी मार्ग ठेवला नाहीत. अधिवासाभोवती प्रगतीचा किल्ला उभा केला आणि मला अदृश्य व्हायला सांगितलं. ग्लोबल बिग कॅट समिट आयोजित करण्यासाठी पैसे खर्च करणे हे माज्या कॉरिडॉरमध्ये काही वन्यजीव अंडरपास तयार करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
उद्या वृत्तपत्रात माझी बातमी येईल. दुर्दैवी. शर्मनाक. काही जण आरआयपी लिहितील. चौकशीची हमी दिली जाईल. आणि पुढचा टप्पा वेळेवर सुरू होईल. कारण बीपीएल वाघांसाठी योजना एकच आत्महत्येची चिठ्ठी.




