डीप व्हेन थ्रोम्बोसिसमुळे फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या रक्ताच्या गुठळ्या; न्युईरा हॉस्पिटलमध्ये 24 वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः वाशी येथील न्युईरा हॉस्पिटलमध्ये वेळेवर निदान, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे 24 वर्षीय तरुणाला नवे आयुष्य मिळाले. या तरुणाच्या उजव्या पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या (डीप व्हेन थ्रोम्बोसिस) झाल्या होत्या, ज्या पोटातील मुख्य शिरा आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझमसारखी(फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे) जीवघेणी अवस्था निर्माण झाली होती.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राहणार्या 24 वर्षीय श्री प्रतीक कामरा (नाव बदलले आहे)* या तरुणाच्या उजव्या पायाला सुमारे दहा दिवसांपासून सूज होती. चालणे आणि उभे राहणे त्याच्यासाठी अवघड झाले होते. बाह्य उपचारांनी फरक न पडल्याने रुग्णाची प्रकृती आणखीच बिघडत गेली. रुग्णालयात दाखल होईपर्यंत सूज पोटरीपासून ते मांडीपर्यंत वाढली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान त्याचा रक्तदाब आणि नाडीची गती वाढल्याचे आढळून आले, तसेच रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे दिसून आली.
डॉ. चंद्रशेखर तुलसीगेरी (क्रिटिकल केअर व ए अँड ई विभाग प्रमुख,न्युईरा हॉस्पिटल, वाशी) यांनी सांगितले की, तपासणीत पायातील प्रमुख शिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताच्या गुठळ्या आढळून आल्या, ज्या थेट मुख्य शिरेपर्यंत पोहोचल्या होत्या. पुढील तपासणीत दोन्ही फुफ्फुसांमध्येही रक्ताच्या गुठळ्या असल्याचे स्पष्ट झाले. रक्त तपासणीत होमोसिस्टीनची पातळी अधिक असल्याचे समोर आले, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढला होता.
रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने रुग्णाला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. अँटीकोआगुलंट औषधे, द्रवपदार्थ आणि इतर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. क्रिटिकल केअर तज्ज्ञ, हेमॅटोलॉजिस्ट आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट यांच्या टिमने रुग्णावर उपचार केले. डॉ. निशांत तावडे (कन्सल्टंट फॅमिली मेडिसिन, न्युईरा हॉस्पिटल, वाशी) यांनी सांगितले की, रुग्णाचे वय खूप कमी असून त्याला अतिशय गंभीर स्वरूपाचे क्लॉट्स होते. त्यामुळे प्रगत उपचार पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक होते. अँजिओजेट थ्रोम्बेक्टॉमी या आधुनिक पद्धतीने रक्ताच्या गुठळ्या काढून टाकण्यात आल्या.
फुफ्फुसांपर्यंत नवीन गुठळ्या जाऊ नयेत म्हणून मुख्य शिरेत खतउ फिल्टर बसवण्यात आला. कॅथेटरच्या मदतीने क्लॉट-विरघळणारी औषधं देण्यात आली. मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या पायात साधी सूज आणि वेदना यापासून सुरू झालेली समस्या इतक्या गंभीर अवस्थेत बदलू शकते. जेव्हा मला सांगण्यात आले की रक्ताच्या गुठळ्या माझ्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्या आहेत, तेव्हा मी खुप घाबरलो. न्यूईरा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. मी आता माझ्या दैनंदिन कामांना पुन्हा सुरूवात केली आहे अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री. प्रतीक कामरा (नाव बदलले आहे) यांनी व्यक्त केली.
हे प्रकरण न्यूईरा हॉस्पिटलमध्ये प्रगत उपचार सुविधांची उपलब्धतेचे उत्तम उदाहरण ठरते. त्वरित निदान, चोवीस तास आयसीयू सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचाराची संधी याठिकाणी उपलब्ध आहे अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे उपाध्यक्ष आणि सीईओ डॉ. माताप्रसाद बी गुप्ता यांनी व्यक्त केली. वेळीच करण्यात आलेल्या उपचारांमुळे रुग्णाची प्रकृती सुधारली असून तो आता नियमित वैद्यकीय तपासणीखाली आपले दैनंदिन आयुष्य पुर्ववत जगु लागला आहे. न्यूईरा हॉस्पिटलमधील या यशस्वी उपचारांनी वेळेवर निदान आणि तज्ज्ञ उपचारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.




