पनवेल : मुंबईनंतर नवी मुंबई व कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहरात डान्सबार व कथित अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वारंवार कारवाई झाल्याच्या बातम्या समोर येतात; मात्र दुसऱ्याच दिवशी हे डान्सबार पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी अमली पदार्थांची विक्री, अल्पवयीन व महाविद्यालयीन युवक-युवतींची वाढती वर्दळ, तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. “कारवाई होते, पण ती कागदोपत्रीच राहते,” असा आरोप नागरिक करत आहेत.
यापूर्वी या विषयावर दिवंगत राष्ट्रवादी नेते आर. आर. पाटील यांनी आवाज उठवला होता. तसेच माजी आमदार विवेकानंद पाटील यांनीही विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर काही प्रमाणात कारवाई झाली; मात्र कालांतराने हा विषय पुन्हा थंडावल्याचे दिसते.
दरम्यान, पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या प्रक्रियेमुळे शहराचे महत्त्व वाढले आहे. औद्योगिक वाढ, वाढती लोकसंख्या आणि शिक्षणसंस्था यामुळे शहराची सामाजिक जबाबदारीही वाढली आहे. अशा परिस्थितीत बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
शहरातील दोन आमदार, महापौर आणि संबंधित प्रशासनाने या प्रकरणी स्पष्ट भूमिका जाहीर करून सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशी पनवेलकरांची मागणी आहे. “चिरीमिरीच्या जोरावर कायदे धाब्यावर बसवले जात असतील, तर ते थांबवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विशेष म्हणजे शहरात अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी तात्काळ व ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आता प्रश्न एकच — पनवेलमधील डान्सबारांवर कायमस्वरूपी आणि कठोर कारवाई कधी होणार? प्रशासनाने याबाबत मौन सोडून ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी जनतेची ठाम मागणी आहे.




