शिंदेंचा ‘विश्राम’ की वादळापूर्वीची शांतता? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व खाती सोपवली दुसऱ्यांकडे!
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधिवेशन काळापुरती आपल्या ताब्यातील सर्व महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी शिंदेंनी आपल्या सहकारी मंत्र्यांकडे सोपवली असून, तसे अधिकृत पत्रच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. शिंदेंच्या या ‘धक्कातंत्रा’मुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गोटात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सहकाऱ्यांकडे सोपवली किल्ल्या
एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती आता त्यांच्या विश्वासू मंत्र्यांच्या हाती असतील. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दादाजी भुसे सांभाळणार असून, नगरविकास विभागाचा कार्यभार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, गृहनिर्माण विभागाची सूत्रे शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या रणधुमाळीत उत्तरे देण्याची वेळ असतानाच शिंदेंनी हा प्रभार का सोपवला, याचे गूढ कायम आहे.
अजित पवारांच्या विरहाने सभागृह भावूक
हे अधिवेशन ऐतिहासिक आणि तितकेच दुःखद ठरणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील अकाली निधनामुळे अर्थखात्याची धुरा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांभाळावी लागत आहे. ६ मार्च रोजी फडणवीस आपला अर्थसंकल्प सादर करतील. आज कामकाजाच्या सुरुवातीला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने श्रीगणेशा होईल आणि त्यानंतर संपूर्ण सभागृह अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत शोकप्रस्ताव मांडेल.
सुनेत्रा पवार यांची एन्ट्री आणि शोकप्रस्तावाचा आग्रह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अधिकृत परिचय सभागृहाला करून देतील. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्याबद्दलचा शोकप्रस्ताव केवळ अध्यक्षांनी न वाचता, त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी आणि सदस्यांनी स्वतःची मते मांडावीत, असा आग्रह धरण्यात आला आहे. अजित दादांचे राजकारणातील अफाट कर्तृत्व पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेत्याविना रणकंदन
२३ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान चालणारे हे अधिवेशन अनेक अर्थांनी वेगळे आहे. यंदा समोर सक्षम विरोधी पक्षनेता नसला तरी, विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. मात्र, एकीकडे शिंदेंनी स्वतःला खात्यांच्या जबाबदारीतून तात्पुरते मोकळे करणे आणि दुसरीकडे फडणवीसांनी तिजोरीची सूत्रे हाती घेणे, यातून राज्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
—
Deepak Kaitke




