टॉप स्टोरी राजकारण

‘दादा, तुमचा हा एकच निर्णय चुकला…’; विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उलगडला मैत्रीचा हळवा कोपरा

मुंबई, विशेष प्रतिनिधी:”अजितदादा, तुम्ही आयुष्यात घेतलेले अनेक राजकीय निर्णय काळाने योग्य ठरवले, पण जगाचा निरोप घेण्याचा हा निर्णय मात्र पूर्णपणे चुकला आहे. तो निर्णय मागे घ्या आणि परत या…” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील आर्त साद विधान परिषदेत घातली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना शिंदे यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.

मैत्रीच्या ‘ट्रँगल’चा आधार तुटला

राज्याच्या सत्ताकारणातील ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’चा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “मी, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीची नवीन भूमिती रचली होती. पण २८ जानेवारीच्या त्या भीषण अपघाताने आमचा एक भक्कम खांब हिरावून नेला. नेहमी वेळेचे पक्के असणारे दादा त्या दिवशी नियतीकडून होणारा घात रोखू शकले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे.” टीव्हीवर अपघाताची ती भीषण दृश्ये पाहून आजही थरकाप उडतो, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

कडक शिस्त आणि मृदू मन

अजितदादांच्या कामाच्या पद्धतीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “प्रशासनावर त्यांची हुकूमत होती. फाईल पाहताच एखाद्या स्कॅनरप्रमाणे त्यांची नजर चुका शोधून काढायची. मंत्रालयातील लटकणाऱ्या वायरपासून ते पायऱ्यांच्या स्वच्छतेपर्यंत त्यांची बारीक नजर असायची. ११ वेळा अर्थसंकल्प मांडणारा हा विक्रमी नेता बाहेरून जरी फणसासारखा कडक वाटत असला, तरी आतून तो अत्यंत कोमल मनाचा होता.” ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करून त्यांनी राज्याच्या अर्थकारणाचा पोत सुधारल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

‘एकनाथराव असतील तर चालेल’ – तो विश्वास!

शिंदे यांनी एका जुन्या आठवणीला उजाळा देताना सांगितले की, हॉटेल हयातमधील एका ऐतिहासिक बैठकीत जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न आला, तेव्हा अजितदादांनीच “एकनाथराव मुख्यमंत्री असतील तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल” असे सांगून मैत्रीची प्रचिती दिली होती. कामाच्या व्यापातही ते मला नेहमी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला मोठ्या भावाच्या नात्याने द्यायचे, असेही शिंदे म्हणाले.

सुनेत्रा ताईंच्या पाठीशी दोन भाऊ खंबीर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलासा देताना शिंदे म्हणाले, “ताई, आभाळाएवढं दुःख असूनही तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात. तुमचे हे दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.”

या शोकप्रस्तावावेळी शिंदेंनी माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *