अजितदादांच्या अपघातामागे १० लाखांचे ‘कमिशन’ कनेक्शन? रोहित पवारांचा बड्या विमान कंपनीवर घणाघाती आरोप!
विशेष प्रतिनिधी:अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागे विमान कंपनीची नफेखोरी आणि नियमांचे उल्लंघन कारणीभूत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “केवळ १० लाख रुपयांचे नुकसान वाचवण्यासाठी अजितदादांचा जीव धोक्यात घातला गेला का?” असा थेट सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी व्हिएसआर (VSR) कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी कंपनीच्या ‘कॉस्ट कटिंग’ धोरणावर कडाडून टीका केली. डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन करून वैमानिकांवर कमी वेळात विमाने उडवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला. “एका वैमानिकाला किमान १२ तासांची विश्रांती मिळणे आवश्यक असताना, त्याला अवघ्या ७ तासांत पुन्हा कामावर बोलावले जाते. नकार दिल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. अशा तणावाखाली वैमानिक सुरक्षित विमान कसे उडवणार?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
काय होते ते १० लाखांचे गणित?
रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांना बारामतीला सोडल्यानंतर ते विमान शमशाबादमार्गे पाटण्याला जाणार होते. बारामतीत व्हिजिबिलिटी अत्यंत कमी असतानाही विमान उतरवण्याचा अट्टाहास का झाला, याचा उलगडा करताना ते म्हणाले, “जर खराब हवामानामुळे हे विमान पुणे किंवा दुसऱ्या विमानतळावर वळवले असते, तर कंपनीचे नियोजित १० लाख रुपयांचे नुकसान झाले असते. हे नुकसान टाळण्यासाठीच कंपनीच्या दबावाखाली वैमानिकाने धोका पत्करून विमान उतरवण्याचा प्रयत्न केला असावा.”
विमानातील सुरक्षा यंत्रणा मुद्दाम बंद होती?
या अपघातातील तांत्रिक बिघाडांकडे लक्ष वेधताना रोहित पवार म्हणाले की, विमानात अत्यंत महत्त्वाची असलेली ‘स्टॉल वॉर्निंग सिस्टिम’ बंद होती. इतकेच नाही तर कॉकपिटमधील संवाद साधणारी यंत्रणाही (PTT) नीट काम करत नव्हती. “विमानाचे बेस मेंटेनन्स कोणाच्या देखरेखीत झाले? यंत्रणा बंद असताना विमान हवेत का झेपावले?” असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्सची सखोल तपासणी झाल्यास या विमान कंपनीचे अनेक काळे कारनामे उघड होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या खळबळजनक विधानांमुळे आता या विमान अपघाताच्या चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
—
Deepak Kaitke




