अजितदादांच्या केबिनमधील तो जरब आणि माणुसकी आता कोठे शोधायची? पहाटेच्या ‘स्टॉर्म’चे पडद्यामागचे साक्षीदार का कोसळले?
मुंबई | विशेष प्रतिनिधी:ज्यांच्या एका शब्दावर मंत्रालयाचे सहा मजले हादरून निघायचे, ज्यांच्या कडक शिस्तीने बड्या सनदी अधिकाऱ्यांचाही घाम सुटायचा, त्या अजित पवार यांच्या निधनाने आज केवळ त्यांचे कार्यकर्तेच नव्हे, तर त्यांच्या केबिनबाहेर दिवसरात्र तैनात असलेले कर्मचारीही सुन्न झाले आहेत. ‘दादा’ म्हणजे केवळ सत्तेचे केंद्र नव्हते, तर ते या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील ‘टाईम मॅनेजमेंट’ आणि ‘शिस्तीचे’ चालतेबोलते विद्यापीठ होते.
“दादा फाईलवरील वर्षभरापूर्वीचा शेराही विसरत नसत!”
आयटी इंजिनिअर आलम शेख यांच्यासाठी दादांसोबतचे काम म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. ते सांगतात, “सकाळी आठची मीटिंग म्हणजे दादा पावणे आठलाच हजर! बैठकीच्या टेबलवर पाण्याची बाटली कोणत्या कोनात ठेवली आहे, इथपासून त्यांचं बारीक लक्ष असायचं. प्रशासनाचा इतका गाढा व्यासंग होता की, एखाद्या फाईलवर त्यांनी वर्षापूर्वी काय सही केली होती, हे त्यांना अचूक आठवायचं. ऑफिसमध्ये कागदाचा कपटा दिसला तरी ते स्वतः उचलायचे आणि मग संबंधित कर्मचाऱ्याची शाळा घ्यायचे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम प्रशासक आम्ही गमावला आहे.”
“नेत्यासारखे नाही, तर राजासारखे वागायचे!”
गेल्या सहा वर्षांपासून दादांकडे टंकलेखक म्हणून काम करणारे जगदीश कुलकर्णी सांगतात, “दादा लोकांसाठी राजा होते. सामान्य नेत्यांसारखे ते फक्त आश्वासन देऊन थांबायचे नाहीत, तर लोकांचे काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचे. कामाचा कितीही ताण असला, तरी आमच्यासारख्या छोट्या कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी दादा एखाद्या पालकासारखी घ्यायचे.”
“दादा नावाचा ‘बाप’ माणूस हरवलाय!”
२००८ पासून दादांच्या कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणारे निळकंठ पवार यांच्या शब्दांतून दादांच्या माणुसकीचे दर्शन घडते. ते म्हणतात, “दादांचा वक्तशीरपणा आणि जरब अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्या जरबेच्या मागे एक अत्यंत हळवं आणि काळजी घेणारं मन होतं. आज कार्यकर्ते टाहो फोडत आहेत की ‘दादा परत या’, पण हे आता निसर्गाला मान्य नाही. राजकारणात कोण येईल आणि जाईल, पण आमच्यासाठी ‘दादा’ नावाचा जो बापमाणूस हरवलाय, त्याची पोकळी कधीच भरून येणार नाही.”
एक पर्व संपलं, शिस्तीचा अध्याय मिटला!
मंत्रालयातील ए-४ बंगला असो किंवा उपमुख्यमंत्री कार्यालय, दादांच्या उपस्थितीने तिथे नेहमीच एक वेगळी ऊर्जा असायची. अधिकाऱ्यांची पूर्ण तयारीनिशी येण्याची धडधड आणि कर्मचाऱ्यांची तत्परता आता एका शांततेत रूपांतरित झाली आहे. दादांच्या त्या पहाटेच्या बैठका, अर्जावर पडणारा तो खणखणीत शेरा आणि चुकल्यास मिळणारा तो प्रेमळ ओरडा आता केवळ आठवणींच्या पानांवर उरला आहे.
—
Deepak Kaitke




