विलीनीकरण की नवा संघर्ष? ‘दादां’च्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होणार की पक्ष विखुरला जाणार?
(संदीप काळे)अजित दादा यांच्या निधनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची आता अघोषित सेवानिवृत्ती असेल, दिल्लीचे राजकारण सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील,पार्थ पवार, रोहित पवार पवारांचे राजकारण पुढे चालवतील, हे आज ना उद्या आता पुढे येईल? राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांना पवारांच्या कन्या म्हणून अजितदादा यांच्या बहीण म्हणून कितपत स्वीकार करेल यावर शंका आहे. असे अनेक जर तरचे विषय आहेत. दादांच्या जाण्याने राज्याची झालेली हानी कोणीही भरून काढू शकत नाही.
सत्तेचे गणित, पक्षाचे नेतृत्व, प्रशासकीय शिस्त आणि आगामी निवडणुकांची दिशा या सर्व बाबी एकाच वेळी अनिश्चिततेच्या छायेत गेल्या आहेत. अजित पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर निर्णयक्षम प्रशासक, कडक शिस्तीचे प्रतिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे सर्वस्व होते. त्यांच्या जाण्याने पक्षासमोर नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला असून, पुढील वाटचाल कोणाच्या हाती जाणार, याबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या पश्चात पक्षाचे नेतृत्व कोण सांभाळणार, यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क मांडले जात आहेत. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल भावनिक ओलावा असून, पवार कुटुंबाचा चेहरा म्हणून त्या पक्षाला एकत्र ठेवू शकतील, असे मत अनेक नेत्यांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात सक्रिय असले तरी प्रशासकीय अनुभवाचा अभाव ही त्यांची मर्यादा मानली जात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी, संसदीय राजकारण आणि दिल्लीतील हालचाली हाताळण्यासाठी तटकरे आणि पटेल यांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा नव्याने वेग घेत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या विलीनीकरणाबाबत आधीपासूनच कुजबुज सुरू होती. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. आता ‘दादां’च्या जाण्यामुळे निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात हे विलीनीकरण जलद गतीने होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, जर दोन्ही गट एकत्र आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा महाविकास आघाडीचा भाग बनेल. असे झाल्यास सध्या सत्तेत असलेले ४१ आमदार भाजपसोबतच राहण्यावर ठाम राहिले, तर पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार हे महायुती सरकारमधील अत्यंत महत्त्वाचा दुवा होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी २०२५–२६ या आर्थिक वर्षाचा सुमारे सात लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. राज्याच्या आर्थिक नियोजनात त्यांचा अनुभव आणि पकड सर्वमान्य होती. त्यांच्या निधनानंतर हा अर्थसंकल्प प्रभावीपणे राबवणे हे नव्या अर्थमंत्र्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. यासोबतच आगामी निवडणुकांसाठी महायुतीतील जागावाटपाचे गणित ठरवताना अजित पवारांची निर्णायक भूमिका राहायची. आता ही जबाबदारी कोण पार पाडणार, हा प्रश्न महायुतीसमोर उभा राहिला आहे.
बारामतीचा विकास आणि तेथील राजकारण अजित पवारां भोवतीच फिरत होते. त्यांच्या निधनामुळे बारामतीकरांनी आपला राजकीय आधार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने, सहकारी बँका आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रातही नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांचा कार्यकर्ता वर्ग अत्यंत मोठा आणि कट्टर होता. त्यांच्या अचानक जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नैराश्य पसरले असून, अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची थेट, कडक आणि परिणामकारक शैली आता कोणाकडेही नसल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली होती, मात्र त्यातील अनेक प्रकल्प अजून अपूर्ण अवस्थेत आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रो विस्तार, पुणे मेट्रो फेज-२, हिंजवडी-चाकण औद्योगिक पट्ट्याला जोडणारी मेट्रो, तसेच पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग हे प्रकल्प अजित पवारांच्या विशेष लक्षाखाली होते. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी नार,पार,गिरणा नदीजोड प्रकल्प, भामा,आसखेड फेज,२ आणि पवना धरण ते निगडी बंदिस्त वाहिनी यांसारख्या प्रकल्पांना गती दिली होती.
बारामतीला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य संग्रहालय आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट हे प्रकल्पही अजून अंतिम टप्प्यावर आहेत. पुणे रिंग रोड, शिरूर उन्नत महामार्ग, मुळा,मुठा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे २०२६–४७ व्हिजन, चाळीस लाख कोटींची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट हे सगळे प्रकल्प आणि धोरणे आता नव्या नेतृत्वावर अवलंबून राहणार आहेत. अजित पवारांची काम करण्याची पद्धत अत्यंत काटेकोर होती. ते अनेकदा शनिवार किंवा रविवार सकाळी सहा वाजता स्वतः प्रकल्पस्थळी जाऊन कामाचा आढावा घेत. त्यांच्या निधनानंतर असा कडक फॉलो,अप घेणारा प्रशासक न मिळाल्यास हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळण्याची भीती राजकीय व प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आगामी निवडणुकांमध्ये पक्षाकडून राजकीयदृष्ट्या वापरण्याचा प्रयत्न केला जाण्याचीही शक्यता आहे. मात्र, ही सहानुभूती नेतृत्वाच्या ठोस निर्णयांमध्ये आणि संघटनात्मक ताकदीत रूपांतरित होते की नाही, यावरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. आता शरद पवार यांनी मोठे मन करणे आणि सेवानिवृत्ती घोषीत करणे, सुप्रिया सुळे यांनी केवळ दिलीचे राजकारण पाहणे? आणि अजित दादा यांच्यावर अवंलबून असलेल्या, स्वप्ना उराशी बाळगणाऱ्या त्या प्रत्येक नेता, कार्यकर्त्याला न्याय देणे हीच सर्वांच्या मनातील ‘मुख्यमंत्री’ अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे अजित दादांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आज बारामती मध्ये उघडपणे बोलत होते.
(लेखक महासागर मीडिया ग्रुपचे मुख्य समूह संपादक आहेत.)




