काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरपासून संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हे बाधित झालेले आहेत. नागपुरात शेकडो पोती धान भिजले आहे, तर बीड येथील परळी मडखेल शिवारात खरीप पिकाचे नुकसान झालेले आहे, उभे पीक आडवे झालेले आहे. भंडार्यात काढणीला आलेल्या पिकावर या पावसाचा परिणाम होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात गहू, तूर आणि आंबा उत्पादक शेतकरी या पावसाने थजून गेलेले आहेत. यवतमाळ येथे पावसाने गहू पिकाला फटका बसलेला आहे. वाशिम जिल्ह्यात तर रब्बी हंगामातील गहू, कांदा, भिजवाई आणि हरभरा ही पिके बहरात आलेली असताना ढगाळ वातावरणामुळे त्यावर रोगराई पडण्याची चिंता व्यक्त होत आहे, आता तर तिथेही पाऊस झाल्याचे वृत्त आहे. एकूण परिस्थिती पाहता पावसाने आक्रमण करून उभ्या रब्बी पिकांची अक्षरशः धूळधाण केलेली आहे.
दोन दिवसांपूर्वी आम्ही राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून येत असताना उदयपूरनंतर ५० किलोमीटरपासून जोरदार पाऊस सुरू झाला, तो भोपाळ येण्यापूर्वी ५० किलोमीटर आधीच थांबला. त्यावेळेला उभ्या पिकांची होत असलेली नासाडी आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघितली. बऱ्याच ठिकाणी गव्हाचे उभे पीक आडवे झाले होते. तेथील एका चहाच्या टपरीवर एक शेतकरी भेटला. “आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी करायची आहे, त्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे. माझ्या शेतीतील पिकातून चार-आठ दिवसांतच मला तीन ते चार लाख रुपये मिळाले असते, पण आता गव्हाची नासाडी झाल्यामुळे माझ्या हाती केवळ ३५ ते ४० टक्केच पैसे येतील,” असे तो म्हणाला. त्याची ही रडकथा ऐकून आम्हाला तिथला चहाही गोड वाटत नव्हता.
काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस बऱ्याच ठिकाणी पडला, ज्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकऱ्याने जे दुःख व्यक्त केले होते, तेच दुःख आमच्या शेतकऱ्यांचे आहे याचा अनुभव आम्हाला आला. सध्या दररोज पिकाचा विमा काढण्यासाठी वेळोवेळी जाहिराती येत असतातच, त्यासाठी शेतकरी विम्याची रक्कम भरतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विम्याचा लाभ मिळत होता, आता ती योजनाही बंद झालेली आहे. तर विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विम्याचा हप्ता घेताना जी जी आश्वासने देतात, ती आश्वासने जसे शेतकऱ्यांचे पीक आडवे होते तशीच त्या विमा कंपन्यांची आश्वासनेही आडवी होत असतात. सध्या निवडणुका नसल्यामुळे सगळीकडे सरकार सुस्त आहे, कारण सरकारने आधीच आपली थैली रिकामी करून ठेवलेली आहे. आधीच जी आश्वासने सरकारने दिली आहेत, ती पाळण्यासाठी दरमहा हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. म्हणजे आता या सुलतानीसोबत अस्मानी संकटाचेही मुसळधार बरसू लागलेले आहे.
आपल्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि विकतचा शेतमाल घेणाऱ्यांना या संकटाची कल्पना करता येणे शक्यच नाही. तसेही देशातील ६०% जनतेला फुकट धान्य मिळतेच. या धान्याशिवाय इतरही मोठा खर्च असतो हेही लक्षात घेतले पाहिजे, पण किमान दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे ना, याचे समाधान असतेच असते. अनेक वेळा आम्ही टिपल्याप्रमाणे, काम न करता मिळणारे हे अन्नधान्य किंवा रोख रक्कम जनतेला आळशी बनवत आहे. “काहीच काम न करता पोटाची खळगी भरते ना, मग कशाला काम करायचे?” असा सूर अनेकजण लावतात, ज्यांना शेतकऱ्यांच्या मेहनतीची कल्पनाच नसते.
ऐन मोसमात पिके भरात येण्याच्या काळात, म्हणजेच परिपक्व पीक घरी पोहोचण्याच्या वेळेत, त्यावर वेगवान वाऱ्यासोबत गारपीट आणि जलवर्षाव होत असेल, तर शेतकऱ्यांच्या या पिकाला नुकसानीपासून वाचवणे कोणालाही शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचा पाऊस संपल्यावर रब्बी पिकावर कुठले ना कुठले आक्रमण येतच आहे. हे आक्रमण आता नियतीचेच झालेले आहे. या देशातील आधीच डबघाईला आलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या संकटात आहे. त्यातच शेतकऱ्यांना आता ना सरकारची मदत आहे ना देवाची मदत आहे. देव-देव करत रडत बसण्यापेक्षा दुसरे काहीच येथील शेतकऱ्याला करता येणार नाही आणि असे असूनही, शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी काही करावे असे सरकारलाही वाटत नाही.



