नवी मुंबई

वाशीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अन्याय? हजेरी शेड हटविण्याच्या निर्णयाने संताप…

नवी मुंबई :नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यामागे ज्यांचा घाम गळतो त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवरच आता संकट कोसळण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी परिसरात उभारण्यात आलेले स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हजेरी व निवारा शेड हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने महिला व पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाशी बस डेपो मागील भाजी मार्केट परिसरात, वाशी गुरुद्वाराच्या मागील बाजूस हे शेड कंत्राटदारामार्फत उभारण्यात आले होते. या ठिकाणी दररोज स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जाते. तसेच महिला व पुरुष कर्मचारी येथेच गणवेश बदलतात आणि दुपारच्या विश्रांतीवेळी भोजन करतात. शहराच्या विविध भागांत साफसफाई आणि सौंदर्यीकरणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी हे शेड केवळ औपचारिक जागा नसून मूलभूत गरज बनली आहे.

मात्र, गुरुद्वारा समितीकडून कोणताही प्रत्यक्ष त्रास होत नसतानाही हे शेड हटविण्याची मागणी करणारे पत्र मनपाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने मनपाकडून शेड हटविण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे हे कर्मचारी आता गणवेश कुठे बदलणार? महिला कर्मचाऱ्यांनी कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा कुठे मिळणार? दुपारचे भोजन उघड्यावर करावे लागणार का? शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांनाच मूलभूत सुविधा नाकारणे कितपत न्याय्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली असून, पर्यायी व्यवस्था न करता शेड हटविण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. शहराच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांच्या सन्मान आणि सुविधांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *