मुंबई

मुंबईकरांच्या ‘मोकळ्या श्वासा’वर आता खाकीचा पहारा; बागांमधील टवाळखोर आणि नशिखोरांना चाप बसणार!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात विरंगुळ्याचे साधन असलेल्या ८९५ उद्यानांची सुरक्षा आता अधिक कडक होणार आहे. बागांमध्ये वाढलेला गर्दुल्ल्यांचा वावर आणि महिला-मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला संयुक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.
मुंबईत सध्या ६०४ उपनगरीय आणि ३७ चांदिवली क्षेत्रातील उद्यानांसह एकूण ८९५ मनोरंजनाची ठिकाणे आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्याने तिथे समाजकंटकांचा वावर वाढल्याच्या तक्रारी आमदारांनी सभागृहात मांडल्या. यावर कडक भूमिका घेत मंत्री देसाई म्हणाले की, “उद्यानांच्या देखभालीसाठी कंत्राटदार नियुक्त असले तरी, जिथे गरज आहे तिथे ‘मेस्को’च्या (MESCO) माध्यमातून प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात केले जातील.”
विशेषतः मानखुर्द आणि चांदिवली सारख्या संवेदनशील भागांमधील उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी पोलीस आणि महापालिका अधिकारी ‘सरप्राईज व्हिजिट’ (अचानक भेट) देणार आहेत. नशिखोरांना हुसकावून लावण्यासाठी आणि उद्यानांचे पावित्र्य राखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अधिवेशन संपताच पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली असून, लवकरच मुंबईतील सर्व उद्याने सीसीटीव्ही आणि पुरेशा सुरक्षेने सज्ज होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *