अंजनगावात परिरक्षकासह पाच जणांवर गुन्हा; दोन आरोपींना अटक
अमरावती: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत अंजनगाव सुर्जी येथील एका परिक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंग्रजी विषयाच्या दोन उत्तर पत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याचे भरारी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी उपशिक्षणाधिकाºयांच्या तक्रारीवरून परिरक्षक आणि सहपरिरक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणधिकारी रजनी शिरभाते यांच्या नेतृत्वातील भरारी पथक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:४० वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्रावर तपासणीसाठी पोहोचले.
यावेळी परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता.
तपासणी दरम्यान पथकाला केंद्र व्यवस्थापनात मोठा गोंधळ दिसून आला. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिका सील करण्याची प्रक्रिया वेळेत होणे बंधनकारक असताना, सायंकाळी उशिरापर्यंत उत्तरपत्रिका सील करण्यात आल्या नव्हत्या. पथकाने अधिक बारकाईने पाहणी केली असता, अनिल हाडोळे नावाचा कर्मचारी संशयास्पद हालचाली करताना आढळला. पथकाने त्याला थांबवून तपासले असता, त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेल्या दोन उत्तरपत्रिका सापडल्या. त्यापैकी एक उत्तरपत्रिका इंग्रजी माध्यमाची आणि दुसरी उर्दू माध्यमाची होती. याबद्दल विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकारावेळी परीरक्षक सुधीर खोडे आणि सह-परीरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर हे घटनास्थळी उपस्थित होते, तरीही त्यांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.
हेही वाचा सर्व उत्तरपत्रिका विहित वेळेत कस्टडीत जमा करणे बंधनकारक असते. मात्र आरोपींनी संगनमत करून दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्या. तपासात या प्रकारामागे गैरहेतू असल्याचे निष्पन्न झाले असून, परीक्षेच्या पवित्रतेलाच तडा गेला आहे.
तक्रारीवरून गुन्हा नोंद – जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रजनी शिरभाते यांच्या तक्रारीवरून पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये परिरक्षक सुधीर खोडे, उपपरिरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर, खाजगी इसम अनिल हाडोळे, तसेच दोन अज्ञात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यातील सुधीर खोडे आणि अनिल हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे तर सुशीलकुमार अभ्यंकर फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि ठाणेदार सूरज बोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.




