अमरावती वर्धा

डीपीसी सभेत खासदार अमर काळे यांची आक्रमक भूमिका; निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

प्रस्तावित एकाही कामास मंजुरी नसल्याने खासदारांचा तीव्र संताप

वन्यप्राण्यांच्या नुकसानीवर भरपाईसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींच्या पंचनाम्यांसाठी महसूल विभागाला निर्देश

अमरावती/वर्धा :- दि. २४ जानेवारी २०२६ : अमरावती जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे उपस्थित होते. यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेत खासदार अमर काळे यांनी सुमारे ३१ कोटी रुपयांची विविध विकासकामे प्रस्तावित केली होती. मात्र प्रस्तावित एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसल्याने त्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.

या संदर्भात जिल्हाधिकारी अमरावती यांना चार ते पाच पत्रांद्वारे माहिती मागवूनही कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला. “मी लोकप्रतिनिधी नाही का? मला कामे प्रस्तावित करण्याचा अधिकार नाही का? मतदारसंघातील जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी निधी नाकारण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रस्तावित कामांना निधी देण्याचे आश्वासन दिल्याने हा विषय निवळला.
सभेदरम्यान खासदार काळे यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होत असलेल्या नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला.

गेल्या दोन वर्षांत केवळ चार शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती गोळा करून प्रस्ताव वन विभागाकडे सादर करण्याचे तसेच मंजुरी देऊन नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश दिले.

तसेच अतिवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने मदतीचा आदेश जारी केला असतानाही पंचनामे करण्यात आले नसल्याचा मुद्दा खासदारांनी सभागृहात मांडला. शेतकरी अर्ज करत असूनही गटविकास अधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाकडून पंचनामे न झाल्याने मदत वितरित होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी महसूल विभागाला जबाबदारी देत तात्काळ पंचनामे करून मदत वितरित करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभेत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत खासदार अमर काळे यांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रलंबित मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *