मोठी बातमी: दिल्लीच्या रेसमध्ये नागपूरची ‘माया’; दिग्गज नेत्यांना मागे टाकत राष्ट्रपतींच्या निकटवर्तीय महिलेला थेट राज्यसभेची संधी!
विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या अनेक बड्या चर्चांना पूर्णविराम देत, भारतीय जनता पक्षाने ‘नागपूर कार्ड’ खेळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नवनीत राणा किंवा विजया राहटकर यांसारख्या प्रसिद्ध नावांची चर्चा असताना, भाजपने अत्यंत शांतपणे नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काल अचानक मुंबईतून निरोप धाडल्यानंतर इवनाते यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती, ज्यावर आज अधिकृत घोषणा करून भाजपने आपल्या ‘धक्कातंत्राचा’ परिचय पुन्हा एकदा दिला आहे.
माया इवनाते यांची निवड ही केवळ राजकीय नसून ती सामाजिक समीकरणांची मोठी खेळी मानली जात आहे. आदिवासी समाजाचा प्रबळ चेहरा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्तीय म्हणून इवनाते यांची ओळख आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असून, सध्या त्या नागपूर महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे विदर्भातील आदिवासी पट्ट्यात भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अनपेक्षित निवडीसोबतच भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले आणि रामराव वडकुते यांच्याही नावांची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च असताना, ऐनवेळी इवनाते यांचे नाव पुढे करून भाजपने विरोधकांसमोर पेच निर्माण केला आहे. ७ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असली, तरी इवनाते यांच्या रूपाने एका अभ्यासू आणि आदिवासी महिला नेतृत्वाला दिल्लीच्या सभागृहात पाठवून भाजपने ‘वुमन एम्पॉवरमेंट’चा नारा अधिक बुलंद केला आहे.
—
Deepak Kaitke





