टॉप स्टोरी राजकारण

कमळ फुलणार की धक्का बसणार? भाजपच्या राज्यसभेच्या ‘चौकारात’ दोन दिग्गज अन् दोन गुप्त अस्त्रे!

विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राज्यसभेच्या रणांगणासाठी भाजपने आपली ‘फिल्डिंग’ लावली असून, जाहीर केलेल्या चार नावांनी राजकीय गणिते पूर्णपणे बदलून टाकली आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम ठेवत भाजपने अशा काही नावांची घोषणा केली आहे, ज्याची साधी कुणकुणही कोणाला लागली नव्हती. केवळ प्रस्थापित नेत्यांनाच संधी न देता, तळागाळातील कार्यकर्त्यांना थेट दिल्लीच्या तख्तावर धाडण्याची भाजपची ही ‘चाणक्य’ नीती सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

या यादीत विनोद तावडे आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज चेहऱ्यांचा समावेश करून भाजपने अनुभवाचा समतोल राखला आहे. तावडे यांची वाढलेली संघटनात्मक ताकद आणि आठवले यांच्या रूपाने मित्रपक्षाला दिलेली साथ, यामुळे महायुतीची पकड मजबूत झाल्याचे दिसते. मात्र, खरा धक्का बसला तो माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांच्या निवडीने. कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या या दोन नावांच्या माध्यमातून भाजपने एकाच वेळी सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणांची ‘तटबंदी’ अधिक भक्कम केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना, दिल्लीतून आलेल्या या यादीने विरोधकांच्या गोटात शांतता पसरवली आहे. ५ मार्चच्या डेडलाईनपूर्वी भाजपने आपला पत्ता उघड केल्यामुळे आता शिंदे गट आणि अजित पवार गट आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. भाजपच्या या अनपेक्षित ‘मास्टरस्ट्रोक’मुळे राज्यसभेची ही निवडणूक आता केवळ एक औपचारिकता न राहता, आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *