उल्हासनगर , दि . ६ प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी भररस्त्यात दिवसाढवळ्या भ्याड हल्ला केला होता. मालवणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये मध्ये दोन राजकीय नेत्यांनी कट करुन नियोजनबद्धरित्या हा हल्ला घडवून आणला होता. या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मला जीवे ठार मारण्याची सुपारी या राजकीय नेत्यांनी दिली होती, असा स्पष्ट आरोप मालवणकर यांनी केला होता.
या प्रकरणी पाच दिवसानंतर दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली व सद्या ते आधारवाडी कारागृहात आहेत. मात्र या हल्ला प्रकरणातील मुख्य हल्लेखोर ज्याने सुपारी घेऊन त्या दोघांच्या मदतीने हल्ला केला होता, तो मात्र गेल्या महिन्याभरात पोलिसांना सापडत नाही. तसेच मालवणकर यांच्या हातातील तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट व या हल्ल्यात वापरलेली विना नंबर प्लेटची स्कूटर सापडलेली नाही. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, उल्हासनगर -4 येथे पत्रकार सुरक्षा कायद्या व्यतिरिक्त भा. न्या. संहितेच्या विविध कलमांखाली दि. पाच फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यातील सूत्रधार हे राजकीय वलय असलेले व निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेले आहेत. उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या वेळी मालवणकर यांनी वेळोवेळी राजकीय विश्लेष्णात्मक लेख लिहिले होते. हे संपूर्ण पॅनल पराभूत झाले शिवाय त्यांना स्विकृत नगरसेवक पदासही विरोध झाल्याने सूड भावनेने हा हल्ला घडवून आणला, असा स्पष्ट आरोप मालवणकर यांनीआपल्या फिर्यादित केला होता.
या सूत्रधारांना ठाणे जिल्यातील एका बड्या भाजपा नेत्याचे संरक्षण लाभल्याने भाजपात प्रवेश केलेल्या या स्थानिक नेत्यांना पोलीस सहकार्य करीत आहेत, असे मालवणकर याचे ठाम मत आहे. तिसरा आरोपी सापडला तर या सूत्रधारांचे बिंग फुटेल म्हणून तिसरा हल्लेखोर लपवून ठेवला आहे. कदाचित त्याची हत्याही केली जाईल, अशी भीती मालवणकर यांनी व्यक्त केली आहे.
सततच्या पाठपुराव्या नंतर देखील पोलिस धिम्या गतीने व अनास्थेने तपास करण्याचा बहाणा करीत आहेत, असे मालवणकर यांनी, पोलीस महासंचालक,पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस तक्रार निवारण केंद्र, व मानवी हक्क आयोग यांच्याकडे रीतसर तक्रारी केल्या.दरम्यान मानवी हक्क आयोगाने मालवणकरांची तक्रार दाखल करुन घेतल्याने राजकीय दबावापोटी मंद व अनास्थेने तपास करणाऱ्या पोलिसांवर चाप बसून मला योग्य न्याय मिळेल, असा आशावाद मालवणकर यांनी व्यक्त केला आहे.



