चतुष्पादाच्या पोटात दुखू लागले की दिवस-रात्र लाथा मारायचे काम तो नेटाने करतो. पण त्याचे लाथा मारणे व्यर्थ आहे असे दिसून आल्यानंतर त्यातील व्यर्थपणा त्याला जाणवू लागतो आणि मग यथार्थतः सर्वत्र त्याला वेड्यात काढले जाते.
आपल्या विदर्भ साहित्य संघात संघ वाचवण्यासाठी दररोज लाथा मारणे सुरू होते. पण आज निकाल आल्यावर त्यांच्या भाळी अर्धचंद्रही आला नाही. ही निवडणूक पहिल्यांदाच होत आहे; आतापर्यंत आपसात बसूनच अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड होत असे. यावेळीही ‘वाचवा’ वाले जणूकाही आपणच निवडणूक जिंकणार आहोत, अशा थाटात वावरत होते.
पण त्यानंतर विदर्भाचे सांस्कृतिक नेते गिरीश गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी ‘वाचवा’ वाले आणि विद्यमान अध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून निवडणूक अविरोध होईल असा प्रयत्न केला. हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी विद्यमान अध्यक्ष आणि ‘वाचवा’ वाल्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार केला.
चालता चालता अचानक त्यांचे पाऊल का थांबले किंवा त्यांना इंगळी चावली की काय? आणि मग त्यांनी ऐक्याचा दीपक विझवून टाकला आणि अतुलनीय आनंदाऐवजी आमोद-प्रमोद करत अनेकदा विनोदी विधाने करून किंवा अपमानास्पद प्रचार करून दंड थोपटले होते. त्यातल्या त्यात विद्यमान अध्यक्षांनी कोठेही अवमानकारक वक्तव्ये केली नाहीत, पण ‘वाचवा’ वाले असे काही बावरले होते की त्यांच्या मेंदूत शरद ऋतूऐवजी ग्रीष्म ऋतूचे गरम वारे शिरले आणि मग त्यांचा उखाळ्यापाखाळ्या काढण्याचा सपाटा सुरू झाला.
ही निवडणूक संपूर्णपणे गिरीश गांधी यांच्या आसपासच फिरत होती. गिरीश गांधी यांनी या संस्थेच्या इतिहासाला काळीमा फासला, मोक्याची जागा लाटण्यासाठी बिल्डर लॉबीशी संधान बांधले, असे आरोप झाले. बोगस मतदान प्रकरणात गिरीश गांधींवरती कारवाई करा असे ‘वाचवा’ वाल्यांनी आव्हान दिले. विदर्भभर फिरत त्यांनी यथेच्छ बदनामी केली, अमुक एका पक्षाचेच कार्यकर्ते प्रचार करतात असा कांगावा केला. तरी आज मतदारांनी जवळजवळ ६० टक्के मते देऊन गिरीश गांधी यांच्या अध्यक्षपदाला घसघशीत पाठिंबा दिला.
‘राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे’ या न्यायाने आपल्या सुसंस्कृत आयुष्यात जी जी माणसे जोडली, त्यांनी त्यांच्यासाठी जिवाभावाने काम केले. अति उत्साहाच्या भरात कोणाचे काही चुकले असेल पण त्याला जणू काही गिरीश गांधीच जबाबदार आहेत अशा थाटात त्यांच्याविरुद्ध विषारी पाण्याचे पखाले शिंपडण्यात आले. वातावरण कलुषित झाले, शंभर टक्के मराठी माणूस असलेल्या आणि सतत मराठी गोतावळ्यात वावरणाऱ्या गिरीश गांधी यांना हिंदी भाषिक ठरवण्यात आले. आपण जणूकाही मराठी भाषेचे विष्णू आहोत अशा थाटात बदनामीचे सुदर्शन चक्र गरागरा फिरवण्यात आले.
हा प्रकार इतका नकारात्मक होता की त्यामुळे उलट ‘वाचवा’ वाल्यांवरच वाचण्याची पाळी आली. ‘वाचवा’ वाले थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरले आणि त्यांना सपशेल लोटांगण घालावे लागले. विदर्भ साहित्य संघासारख्या प्रतिष्ठित संस्थेला आपण बदनाम करतो आहोत याचे भानही ‘वाचवा’ वाल्यांना नव्हते. निवडणूक लढवा पण निदान आयुष्यात पुन्हा भेटल्यावर मान खाली घालायची पाळी आणू नका, एवढेच आमचे म्हणणे होते.
या सर्व धूमश्चक्रीत दररोज आरोप करणाऱ्या ‘वाचवा’ वीरांना गिरीश गांधी यांच्याकडून एका शब्दानेही उत्तर देण्यात आले नाही. पत्रकारांनी अनेक वेळा विचारणा करूनही गांधी यांनी कोणाविरुद्ध चकार शब्दही काढला नाही. आता निवडणूक संपलेली आहे. पोटात जी काय गरळ होती ती आता ओकली गेलेली आहे. आता तरी या संस्थेच्या परंपरेप्रमाणे संस्थेचे कार्य प्रगतीपथावर गेले पाहिजे.
एककाळी विदर्भ साहित्य संघ साहित्यिकांचा अड्डा होता, तिथे कार्यक्रमांची रेलचेल असे. विद्यार्थी ग्रंथालयाचा उपयोग करीत असत. विदर्भातील एकमेव धनवटे रंगमंदिर विदर्भाची शान होती. पुन्हा या संस्थेचा सूर्य आपल्या पवित्र आणि तेजस्वी किरणांनी आसमंत प्रकाशमान करेल यात आमच्या मनात तरी संशय नाही. गिरीश गांधी यांच्या सृजनशील पॅनेलचे कार्यकारिणीसाठी उभे असलेले सर्व २२ सदस्य निवडून येतील यात शंकाच नाही. ही मतमोजणी रात्रभर चालणार आहे, तेव्हा गिरीश गांधी यांचे स्वागत आणि त्यांच्या पॅनेल मधील सर्व सदस्यांना उज्वल यश लाभेल अशी आम्ही कामना करतो. आता तरी सर्वच उमेदवारांनी एकत्रितपणे या संस्थेचा ध्वज गगनात उंच फडकवावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.




