मराठवाडा आणि दुष्काळ हे समीकरण सर्वश्रुत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची अनास्था यामुळे विषण्ण झालेले बाळासाहेब देशमुख यांनी मनावर घेतले आणि योग्य जलव्यवस्थापन हाच यावर तोडगा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी गावांमध्ये जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. गावातील सीता नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि सरळीकरण करून होणाऱ्या पुराच्या नुकसानीपासून शेतीला वाचविलेच नाही तर पाणी अडवा पाणी जिरवा, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि बांधणी, सिमेंट रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन यातून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील शेंबोली या गावात हरितक्रांती घडवून आणली आहे. आज बाळासाहेब देशमुख यांचा शेंबोली पॅटर्न केंद्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनांमध्ये केंद्रस्थानी आहे.
नांदेड जिल्ह्यातील तीन हजार लोकसंख्या असलेल्या शेंबोलीच्या राजघराण्यातील शेतकरी कुटुंबात बाळासाहेब देशमुख यांचा जन्म झाला. सरपंच राहिलेले आजोबा यांनी गावाच्या विकासासाठी राबविलेल्या विकास कामांना पहातच बाळासाहेब देशमुख लहानाचे मोठे झाले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शेंबोली गावात अनेक वेळा सरपंच राहून चुकलेले बाळासाहेब देशमुख यांनी गावाच्या विकासाची कास धरली. शेंबोली गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतकरी पूर्णतः गावातील सीता नदीवर अवलंबून होते. या नदीमध्ये साचलेला गाळ वाढलेली बेशरमची झाडे, आणि खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या अभावामुळे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या पुराचे पाणी लगतच्या शेतीमध्ये शिरून शेतीचे नुकसान होत होते. वाहून आलेल्या गाळामुळे जमीन नापिक होत होती.
हे टाळण्यासाठी पाखरण कार्यक्रमांतर्गत सीता नदीचे 25 फूट खोलीकरण, 60 मीटर रुंदीकरण आणि तीन मीटर सरळीकरण केले. यासाठी त्यांनी शिरपूर पॅटर्नचा अभ्यास केला आणि वसुमते साहेब यांच्या मार्गदर्शनातून गावात जलसंधारणाचे कार्य हाती घेतले. आज सीता नदीचे पाणी पुरातून वाहून न जाता नदीतच साठून राहते. या प्रकल्पासाठी त्यांनी स्वतःची साडेतीन एकर जमीन दान केली.
शेंबोली गावाचे अनेक वेळा सरपंच राहून चुकलेले बाळासाहेब देशमुख यांनी हेरले की जमिनीतील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होतो पण पाणी जमिनीत जिरविले जात नाही. यासाठी त्यांनी अनेक नादुरुस्त बंधारे दुरुस्त केले आणि जिथे बंधाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे त्यांनी बंधारे बांधले. 1960 मध्ये त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या बंधार्यांची पुनर्बांधणी करून यातील पाणी सात गावांना पुरविल्या जाते. त्यांच्या जलसंधारणाच्या कामामुळे गावातील विहिरी बाराही महिने तुडुंब भरलेल्या असतात. आज मराठवाडा जेथे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो तेथे शेंबोली गावात पाण्याची टंचाई जाणवत नाही. आज महाराष्ट्रभरातून त्यांच्या शेंबोली पॅटर्नचा अभ्यास करण्याकरिता अनेक संशोधक येतात आणि त्यांच्या या प्रकल्पावर अनेकांनी पीएचडी सुद्धा केलेली आहे असे ते अभिमानाने सांगतात.
शेती जर भरभराटीला यायची असेल तर गावात पक्के रस्ते आवश्यक आहे हे त्यांनी हेरले. रस्त्याविना शेती नाही हे ध्येय समोर ठेवून त्यांनी गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधले आणि ग्रामीण मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा दिला. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी फिरून करावी लागणारी पाच किलोमीटरची वाट आता अर्ध्या किलोमीटर पर्यंत आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रान्सपोर्ट खर्च वाचून वाया जाणारा वेळ कमी झाला आहे. पावसाळ्यातही अनवाणी फिरले असता पायाला चिखल लागणार नाही असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
गावामध्ये पूर्णतः पाटिद्वारे घेण्यात येणारे पाणी कमी करून शंभर टक्के ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो. याशिवाय गावातील घनकचरा व्यवस्थापन, 100% शौचालय, शुद्ध पाणी, सुसज्ज असे आधुनिक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, उभारण्यात आले आहे. याशिवाय गावातील पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 14 खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
गावामध्ये खंडोबा महादेव मंदिर आणि भीम टेकडी आहे. येथे सर्व जाती-धर्माचे मंदिरे आणि मज्जिद आहेत. या भौगोलिक वातावरणाचा त्यांनी सकारात्मक पद्धतीने विचार करीत कृषी पर्यटनाला चालना दिली आहे. 35 एकर जमिनीवर डेस्टिनेशन वेडिंगसाठी ते काम करीत आहेत. गावातील महिलांच्या सहभागातून 80 लक्ष रुपयांचे बौद्ध विहाराचे कार्य 90% पर्यंत पूर्ण झाले आहे. चार मेगाव्हेटचा सोलर प्रकल्प सुद्धा प्रस्तावित आहे.
ते मोठ्या अभिमानाने सांगतात ही सर्व विकासकामे शासनाचा एकही रुपया न घेता लोकसहभागातून करण्यात आलेली आहेत. यासाठी गावातील लोकांनी त्यांच्या जमिनी दान केलेल्या आहेत. त्यांच्या या विकास कामांमध्ये त्यांच्या सरपंच असलेल्या पत्नी नीता देशमुख यांचा पूर्ण पाठिंबा असतो. समाजकार्यामध्ये वाहून घेतलेला त्यांचा परिवार विकास कामांशिवाय अडलेल्या गावकऱ्यांसाठी नेहमीच धावून जात असतो. या त्यांच्या विकास कामांची दखल घेत त्यांना राज्य आणि देश पातळीवर 25 च्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. आगामी काळामध्ये ओढाजोड प्रकल्पातून वाया जाणाऱ्या पाण्याचा लाभ गावात होण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणी करीत आहेत. जमिनीतील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस होणारी घट बघता योग्य जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे ते पोटतिडकिने म्हणतात. आज ते जलसाक्षरतेवर जलनायक म्हणून तर जलयुक्त शिवारावर प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
जलसंधारणाच्या माध्यमातून शेंबोली पॅटर्न आज देश पातळीवर अवलंबिल्या जात असून केंद्र सरकारच्या जलसंधारण योजनांतील केंद्रबिंदू झालेला आहे. शेतकऱ्यांप्रती असलेल्या आस्थेने गावातील हरितक्रांतीचे जनक आणि जलनायक ठरलेले बाळासाहेब देशमुख यांचा विकासाचा प्रवास सदैव प्रगतीपथावर राहो यासाठी आमच्या अनेक अनेक शुभेच्छा.




