टॉप स्टोरी महाराष्ट्र

खोडके दाम्पत्याचा मंत्रालयात धडाका! मेळघाटच्या आरोग्य सेवेसाठी सरकारला पाडले नमते; १०२ रुग्णवाहिका अन् रिक्त पदांचा प्रश्न सुटला

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील विस्कळीत झालेली आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिकांच्या टंचाईबाबत आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी सरकारकडे लावलेल्या आक्रमक पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी या दोन्ही नेत्यांनी आज मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांसोबत विशेष बैठक घडवून आणली. या बैठकीनंतर, दुर्गम भागातील १०२ रुग्णवाहिकांचा इंधन प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा यांसारख्या दुर्गम तालुक्यांमध्ये १०२ रुग्णवाहिका सेवा तांत्रिक अडचणींमुळे कोलमडली होती. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे हाल होत होते. ही बाब गांभीर्याने घेत आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी थेट मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांचे दालन गाठले. “दुर्गम भागातील एकही जीव कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे किंवा इंधनाअभावी जाता कामा नये,” अशी आक्रमक भूमिका या दोन्ही लोकप्रतिनिधींनी बैठकीत मांडली.
खोडके यांच्या मागणीनंतर मंत्र्यांचे तातडीचे निर्देश:
आमदार खोडके यांच्या तक्रारीची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी ‘स्पर्श’ प्रणालीमधील तांत्रिक त्रुटी दूर करून चिखलदरा आणि धारणी येथील इंधन पुरवठ्याचा प्रश्न २४ तासांत सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच, या रुग्णवाहिकांवरील कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रलंबित विषय निकाली काढून त्यांची सेवा विनाखंड सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले.
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती होणार:
जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्र्यांनी ही रिक्त पदे युद्धपातळीवर भरण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश विभागाला दिले. यासोबतच तपोवन कुष्ठरोग संस्थेच्या सुधारणांबाबतही खोडके दाम्पत्याने केलेल्या सूचनेनुसार शासन योग्य तो निर्णय घेणार आहे.
आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावती जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला आता नवीन संजीवनी मिळणार आहे. जनतेच्या आरोग्याशी निगडित हे प्रश्न प्राधान्याने सोडवल्याबद्दल जिल्ह्याभरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *