खरी खरी

ज्ञानेश कुमारचा फेरपालट

काल आपल्या ज्ञानामध्ये निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमार यांनी पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. या पाच राज्यांपैकी आसाम वगळता सर्व ठिकाणी एनडीएच्या विरुद्ध असलेल्या पक्षांची सत्ता आहे. या परिस्थितीमुळे ज्ञानेश कुमार यांना पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यात तेथील सत्ताधारी पक्षांना कसेही करून घरी बसवायचे आहे.

या तीन राज्यात एस.आय.आर. च्या नावाखाली लाखो मतदारांची मते निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहेत, याचे नुकसान सत्ताधारी पक्षाला होईल असे बोलण्यात येते. आता आज ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालच्या सर्व बड्या बड्या अधिकाऱ्यांची बदली करून टाकलेली आहे. कायद्याप्रमाणे या राज्यातील सरकारला सध्या काहीच करता येत नाही अशी स्थिती आहे. जे अधिकारी राज्य सरकारच्या दृष्टीने सोयीचे आहेत त्यांना दूर करून ज्ञानेश कुमार यांना जे करायचे आहे ते करणार ‘होयबा’ अधिकारी त्यांनी नियुक्त केलेले आहेत.

निवडणूक आयोगाला निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही अधिकारी बदलण्याचा अधिकार असतो, पण ज्या राज्यात विरोधी पक्षाचे शासन आहे, त्या त्या राज्यातील सरसकट सर्व बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हा प्रकार आपल्या देशात कधी झाला नव्हता. ज्ञानेश कुमार यांनी आपले नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्याचे ठरवलेले दिसते. विरोधकांच्या कोणत्याही मागणीला मान्यता द्यायचीच नाही, विरोधक आणि पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नांची जी सोयीस्कर असतील तेवढीच उत्तरे द्यायची, बाकी प्रश्नांना बगल तरी द्यायची किंवा त्या प्रश्नांवर मौन बाळगायचे हा नवा प्रकार सुरू झालेला आहे.

यापूर्वीचे निवडणूक आयुक्त किलो असतील तर आपण दीड किलो आहोत, ते जर एक शहाणे असतील तर त्यापेक्षा आपल्याला अर्धे शहाणपण जास्त आहे असा ज्ञानेश कुमार साहेबांचा समज असावा. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगालची सत्ता ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती जाऊ नये असा निर्धार करून ज्ञानेश कुमार यांनी हे पाऊल उचललेले दिसते. लोकशाहीत जनतेच्या मताला किंमत असते, पण जनतेपैकी काही लोकांचा मताधिकार वापरण्याचा अधिकारच काढून घेतला, तर निवडणुकीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. हा कार्यक्रम एस.आय.आर. च्या माध्यमातून संपन्न झाला आहे.

आता या निवडणुकीत होणाऱ्या मतदानाला कोणती दिशा दाखवावी की जेणेकरून ममता बाईंच्या हातातील राज्य हिसकावून घेता येईल, असा जबरदस्त सापळा ज्ञानेश कुमार साहेबांनी रचलेला दिसतो. आगामी काळात सर्व अधिकारी सत्ताधारी सरकारच्या धोरणांना वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणू शकतात. ‘तुम्ही कराल ते पाप आणि आम्ही करू ते पुण्य’ असे झकास गणित पश्चिम बंगालच्या बाबतीत तरी ज्ञानेश कुमार यांनी आखलेले दिसते.

या पाच राज्यांपैकी आसामची सत्ता अनेक आरोप असलेल्या हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडे आहे, त्यामुळे ते राज्य आपल्याला नक्कीच जिंकता येईल असा तेथील सत्ताधारी पक्षाचा दावा आहे. तामिळनाडू या राज्यात तेथील विरोधी पक्षांची डाळ शिजत नाही हे ज्ञानेश भाईंना ठाऊक आहे. केरळमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील दोन पक्षांची शत्रूपूर्ण लढत आहे, यापैकी कोणीही जिंकले तरी एनडीएला त्याचा लाभ होऊ शकणार नाही. लहानशा पॉंडिचेरीचा तर विचारही कोणी करत नाही.

अशा राजकीय परिस्थितीत कसेही करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला कंगाल करावे या निर्धाराने परम आदरणीय ज्ञानेश कुमार यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ममताबाईंवरील मतदारांची ममता नेस्तनाबूत करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. या राज्यात मतदानासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणात दंगे होतात, हल्ले होतात, मारामऱ्या होतात, तेवढे देशातील कोणत्याही राज्यात होत नाहीत. यातच आता कोणत्याही न्यायालयाला काहीही करता येणार नाही हेही तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत निर्धाराने लढणाऱ्या रणरागिणी ममता बॅनर्जी यांना एवढ्या विपरीत परिस्थितीतही विजय मिळतो किंवा नाही, हे बघणेच केवळ आपल्या हातात आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *