खरी खरी

आता १० किलोचे फड

जगाचे राजकारण इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे चिंताजनक परिस्थितीत येऊन ठपले आहे. या चिंताजनक परिस्थितीची चिंता करावी की, या परिस्थितीची चिता पेटवावी हेही समजेनासे झालेले आहे. आपल्या देशात गॅसच्या बाबतीत परिस्थिती भीषण आहे. काळजीचे अजिबात कारण नाही असे हमखासपणे सांगण्यात आले होते. पण इराण-अमेरिका युद्धाचा आठवडाही लोटला नाही आणि गॅसच्या बाबतीत आपण किती हतबल झालो आहोत याचे दर्शन जगाला घडले आहे. सुरुवातीला औद्योगिक क्षेत्राला आणि हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवण्यात येणार नाही असा फतवा निघाला. या निर्णयामुळे आपण ज्या काही फशारक्या मारल्या होत्या की आमच्याकडे भरपूर गॅस उपलब्ध आहे, त्यातील विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली.

त्यानंतर जनतेने गॅस मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लावून गॅसची उपलब्धता भरपूर नाही हे दाखवून दिले. मग २५ दिवसानंतरच गॅसची नोंदणी करता येईल असा आदेश काढून गॅसच्या आगीत पेट्रोल टाकण्यात आले. आता या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करण्याऐवजी दहा किलोचे सिलेंडर देण्याचा नवा प्रयोग करण्यात येणार आहे असे म्हणतात. दहा किलोचे सिलेंडर देण्यासाठी सध्याचे सिलेंडर उपलब्ध आहेत त्याचा उपयोग केला जाईल की लहान आकाराचे सिलेंडर जनतेला मिळतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आधीच जनता त्रस्त आहे, त्यात १४ किलोच्या सिलेंडरमध्ये जनतेला ३० दिवस आपला स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे कसाबसा महिना काढण्यावर गॅस मिळवून आपल्याला पुढच्या गॅसची तयारी करावी लागते. आता १४ किलो ऐवजी दहा किलो गॅस भरलेले सिलेंडर दिले तर नव्या सिलेंडरसाठी १५ व्या दिवसानंतरच प्रयत्न सुरू करावे लागतील. तेव्हा कुठे वीस-एकवीस दिवसानंतर सिलेंडर मिळू शकेल. म्हणजे कुटुंब प्रमुखाला दोन महिन्यात तीन वेळा दहा किलोचे सिलेंडर आणावे लागतील. हा ‘द्राविडी प्राणायाम’ करताना गॅस कंपनी, गॅस विक्रेते आणि गॅस धारकांना किती कष्ट पडतील याची कल्पना कोणीही केलेली नाही. कल्पनाशक्ती वापरायचीच नाही आणि त्याचा विचार करायची गरजच नाही असे विचार सार्वजनिकपणे बोलून गोंधळात गोंधळ घालायचा. हा प्रकार एखाद्या गंभीर नाटकातील विनोदासारखा वाटतो.

दहा किलोच्या सिलेंडरचे जे ‘फड’ आहे ते लोकांना विनाकारण मॅड करून सोडेल, ही साधी बाबही कोणाला समजू नये याचे कारण सुद्धा अनाकलनीय आहे. अनेकांनी आपल्या घरात पर्यायी व्यवस्था सुरू केल्या आहेत. कोणी विजेच्या शेगड्या, कोणी कोळसा तर कोणी जळाऊ लाकडाचा उपयोग सुरू केलेला आहे. त्यातच आता सरकारने नवीन व्यवस्था केलेली दिसते. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल बरोबरच रॉकेलही विकण्यात येणार आहे. हे रॉकेल पेट्रोल प्रमाणे नळीने कॅनमध्ये भरले जाणार की लिटरचे माप घेऊन तिथे कोणी विकायला बसणार आहे हे अजून जाहीर झालेले नाही.

आता जनतेने रॉकेलवर चालणारा ‘स्टोव्ह’ नावाचा प्रकार विस्मरणात टाकून दिलेला आहे. हा स्टोव्ह पेटवताना पिन मारणे, त्यानंतर बाहेरून झपाझप पंप मारणे वगैरे गोष्टी ज्यांचे वय १५ ते २० वर्षे आहे अशा मुला-मुलींना माहितीही नाहीत. तेव्हा या पिढीला आम्ही स्टोव्हवर कसा स्वयंपाक करीत होतो हे जुन्या पिढीला दाखवून द्यावे लागेल. एकूणच गॅस टंचाईच्या नावाने आणखी कोणते कोणते विनोदी प्रकार अस्तित्वात येतील यावर न बोललेलेच बरं. दहा किलोच्या सिलेंडरपासून रॉकेलच्या वापरापर्यंत अनेक नव्या गोष्टी आपल्या नव्या पिढीला शिकता येतील. या ज्ञानवृद्धीचे भविष्यकालीन उपयोगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेतूनही एखादा धडा शिकवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वृद्धी करावी लागेल. हे ज्ञान पुरातन असले तरी बऱ्याच वर्षांनंतर आता प्रकट होत आहे, म्हणून त्याचे गुणगान गायलेच पाहिजे. गॅस टंचाईच्या निमित्ताने ज्ञानवृद्धीच्या आणि ज्ञान संपादनाच्या दृष्टीने ही उत्तुंग अशी जबरदस्त झेप घेतली आहे, असे मानून याचेही स्वागत केलेच पाहिजे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *