टॉप स्टोरी राजकारण

सांगलीत जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपचा बालेकिल्ला ढासळला, ‘ऑपरेशन लोटस’चा धुव्वा!

विशेष प्रतिनिधी:सांगली: “काय मोठं? तर जयंत पाटलांचा दम मोठा!” या वाक्याची प्रचिती आज सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातून पुन्हा एकदा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या शांत पण अचूक राजकीय खेळीने भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता हिसकावून घेतली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ. संगीता पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची दणदणीत निवड झाली असून, या विजयाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळापेक्षा ४ मते अधिक मिळाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जयंत पाटलांनी महायुतीतच ‘सुरुंग’ लावला. अजित पवार गटाच्या ४ सदस्यांनी थेट महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, तर शिंदे गटाचे २ सदस्य मतदानावेळी गैरहजर राहिले. यामुळे भाजपने मांडलेला सत्तेचा डाव त्यांच्यावरच उलटला असून ‘ऑपरेशन लोटस’चा पुरता फज्जा उडाला आहे.

या विजयामागे जयंत पाटील यांनी पालकमंत्री असताना राबवलेली ‘मॉडेल स्कूल’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ ही योजना ‘गेमचेंजर’ ठरल्याचे बोलले जात आहे. ग्रामीण भागातील शाळा आणि दवाखान्यांचा झालेला कायापालट मतदारांनी लक्षात ठेवला. त्याचबरोबर, प्रतीक जयंत पाटील यांनी जिल्ह्यात बांधलेले युवकांचे भक्कम जाळे आणि त्यांचे ‘युवा कनेक्शन’ महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडले. प्रतीक पाटलांनी घेतलेले मेळावे आणि युवकांशी साधलेला थेट संवाद यामुळे निकालाचे पारडे राष्ट्रवादीच्या बाजूने झुकले.

सांगली हा नेहमीच राजकीय संघर्षाचा जिल्हा राहिला आहे, मात्र आजच्या विजयाने जयंत पाटील यांनी जिल्ह्यावर आपली पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून सांगलीच्या राजकारणात आता ‘पाटील’ पॅटर्नचीच चर्चा रंगली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *